News Flash

नागपुरात २४ तासांत खुनाच्या तीन घटना

नवीन गृहमंत्र्यांना सलामीलाच गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान!

(संग्रहित छायाचित्र)

नवीन गृहमंत्र्यांना सलामीलाच गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान!

नागपूर : निर्ढावलेल्या गुन्हेगारांचा शहर व जिल्ह्य़ात हैदोस सुरू असून गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे नवीन गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी पदभार सांभाळताच या घटनेतील आरोपींनी त्यांना जणू रक्तरंजित सलामीच दिली आहे. निर्ढावलेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान देशमुख यांच्यासमोर उभे ठाकले असून यासाठी ते  पोलीस विभागाला काय सूचना देतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

यातील पहिली घटना यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत वनदेवीनगर परिसरात घडली. सूडाच्या भावनेतून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शेख समीर ऊर्फ बाबा शेख रमजान (२४) रा. इंदिरामातानगर असे मृताचे नाव आहे.

११ मे २०१७ ला यशोधरानगरमध्ये कुख्यात गुंड प्रवीण शंकर लांजेवार (२२) याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान (२०) आणि समीर ऊर्फ बाबा याला

अटक केली होती. तेव्हापासून प्रवीणचे साथीदार समीरचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. ते संधी शोधत होते. दरम्यान, मंगळवारी समीर हा एकटाच फिरत होता. आरोपींनी त्याचा पाठलाग करून आर.के. सावजी रेस्टॉरेंटमध्ये त्याचा खून केला. विरुद्ध गटातील काहीजण आपला पाठलाग करीत असल्याची चाहूल समीरला लागली होती.  तो  जीव वाचवण्यासाठी लपतछपत घर गाठण्याचा प्रयत्न करीत होता. याकरिता त्याने ठराविक अंतरावर दोन ते तीन सावजी हॉटेलमध्ये थांबण्याचा प्रयत्न केला. आनंदनगर ते कांजीहाऊस बिनाकी मंगळवारी परिसरादरम्यान तो बचावला. पण, वनदेवीनगर परिसरात आरोपींनी सावजी हॉटेलमध्ये  त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक साखरे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही आरोपींना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दुसऱ्या घटनेत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास  वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत गंगा सेलिब्रेशन परिसरात  दगडाने डोके ठेचून २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. मृताची ओळख पटलेली नाही. तो मजूर असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

तिसरी घटना  कन्हान येथील आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. यातील मृत हा शिवसेनेचे प्रभाग-८ चे उमेदवार डायनल शेंडे यांचा जावई असल्याची माहिती आहे. पण, या खुनाचा राजकारणाशी संबंध नसून बारमध्ये दारू पित असताना उद्भवलेल्या भांडणातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

संजू खडसे (३४) रा. कन्हान असे मृताचे नाव आहे. सचिन प्रकाश वाडिभस्मे (२२) रा. कांद्री, भूपेश साहिलकुमार शाहु (१९) रा. भारतनगर, कळमना, सागर रमेश चौधरी (२०) रा. कळमना आणि स्वप्निल ऊर्फ चुहा मराठे (२२) रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संजू खडसे सोमवारी रात्री कन्हानमधील गौरव बारमध्ये एकटाच दारू पित होता. त्यावेळी दुसऱ्या टेबलवर आरोपी दारू पित होते. दरम्यान, आरोपींसोबत संजूचा वाद झाला व एकाने जमिनीवर काचेचा ग्लास फेकला. ग्लास फुटल्याने मोठा आवाज झाला. संजू यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी जोरदार भांडण केले. यात संजूने सचिन वाडिभस्मे याच्या कानशिलात लगावली. याचा वचपा काढण्यासाठी इतर साथीदारांच्या मदतीने सचिनने संजूला बारच्या बाहेर नेऊन चाकूने भोसकले. त्यानंतर दगडाने ठेचले. यात संजूचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 4:53 am

Web Title: three murder in 24 hours in nagpur zws 70
Next Stories
1 वडेट्टीवार यांची नाराजी तीव्र
2 बांबू प्रकल्प फसणार!
3 विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
Just Now!
X