वेगवेगळ्या वेळी असहायतेचा गैरफायदा

एका गतिमंद महिलेवर तीन नराधमांनी वेगवेगळ्या वेळी बलात्कार केला. ही निंदनीय घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पंडित, आकाश आणि मंगल अशी आरोपींची नावे आहेत. मंगल याला अटक करण्यात आली आहे. पीडित मूळची मध्यप्रदेश राज्यातील आहे. कामाच्या शोधात महिनाभरापूर्वी ती पतीसह नागपुरात आली. त्यांनी एका ठिकाणी खोली भाडय़ाने घेतली. या खोलीला दार नव्हते. पडदा लावून ते राहायचे. महिलेला एका ठिकाणी स्वच्छतेचे काम मिळाले. त्यानंतर तिचा पती कामानिमित्त मध्यप्रदेशात निघून गेला. १० मार्चला ती कामावरून परत येत होती. त्यावेळी पंडित नावाच्या ट्रकचालकाने तिला मदत केली. त्या दिवशी आरोपीने रात्री १२ वाजता तिच्यावर बलात्कार केला. तिने परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली, पण एकानेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. काही दिवसांनी १८ मार्चला घरी सोडून देणाऱ्या आकाश नावाच्या ऑटोचालकाने रात्री १ वाजता संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. तिने पुन्हा लोकांना सांगितले. तेव्हाही कुणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. २० मार्चच्या रात्री मंगलने पहाटे तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मात्र मंगलला परिसरातील लोकांनी बघितले.

तिने पतीला घटनेची माहिती दिली.  पोलीस ठाणे गाठून तक्रारही दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक मनीष वानखेडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला गतिमंद असून तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला.

मित्रावर जीवघेणा हल्ला

रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता मित्रानेच मित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. मानसिंग रामसिंग सिकरवार (४५) रा. झेंडा चौक, धरमपेठ असे जखमीचे तर शांताराम सबनिस (४५), अमित घनश्याम पाटील (४३) दोन्ही रा. आंबेडकर वार्ड, धरमपेठ आणि सोनू हनुप्रसाद चौधरी (४५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी शांताराम व मानसिंग हे मित्र आहेत. मानसिंग हा केबल नेटवर्कचे काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने रंगपंचमीच्या सायंकाळी मानसिंग हा रॉबीन नावाच्या मित्रासह वस्तीत उभा असताना आरोपींनी जवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यावरून दोन्ही गटात भांडण झाले व आरोपींनी चाकूने मानसिंगवर हल्ला केला व पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अमित व सोनू यांना अटक केली आहे.