माणसांचा जसा विचार केला जातो तसाच प्राण्यांचाही करायला हवा. पुनर्वसनासाठी लोकांना विचारले जाते, मग वाघांचे पुनर्वसन करताना त्यांना कधी विचारले का, असा सवाल करीत एका जिल्ह्य़ात वाघ अतिरिक्त झालेत म्हणून त्यांचे स्थलांतर करण्याचा पर्याय योग्य नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्य वन्यजीव मंडळाची पहिली बैठक झाली.
मेळघाटमधून प्रस्तावित पूर्णा-खंडवा रेल्वे व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून नेण्यात काहीच अर्थ नाही. रेल्वे ही लोकांसाठी आहे आणि प्रस्तावित जागी आता माणसे नसून वन्यप्राणी आहेत. याबाबत या परिसरातील आमदार, खासदारांशी चर्चा करून रेल्वे बाहेरून नेण्याबाबत केंद्राला पत्र लिहिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, वाघ तुम्हाला आपल्या भावना सांगणार नाही. त्यामुळे वाढलेल्या वाघांच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यांतील तज्ज्ञ लोकांचा अभ्यासगट तयार करून व्यवस्थापन बळकट करण्याची सूचना त्यांनी केली. वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
वृक्षलागवडीचे थोतांड बंद करा..
एखाद्या प्रकल्पासाठी जमीन देताना त्या ठिकाणची झाडे तोडली जातात, पण त्या मोबदल्यात लावण्यात येणारी झाडे पदपथावर लावली जातात. त्यासाठी आमच्यासारखेच मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित असतात. हे वृक्षलागवडीचे थोतांड आता बंद करा. त्यापेक्षा प्रकल्पांना जागाच देऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अवनी’च्या पिल्लाला हक्काचा अधिवास हवा..
‘अवनी’ या वाघिणीला का मारले? तिची काय चूक होती? तिने माणसे मारली ही चूक होती, पण तिला मारणे हा पर्याय नव्हता. तिच्या पिल्लाप्रमाणेच तिलाही जिवंत पकडता आले असते. आता पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात असलेल्या तिच्या पिल्लाला हक्काचा अधिवास मिळवून द्या, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नसबंदी हा शेवटचा पर्याय..
जागतिक स्तरावर वाघाला वाचवण्याची मोहीम सुरू असताना देशाच्या एका जिल्ह्य़ात वाघ अतिरिक्त झालेत म्हणून त्यांची नसबंदी करायची, हा अगदी शेवटचा पर्याय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विकासाचा मुद्दा येतो तेव्हा आपण सातत्याने माणसांचाच विचार करतो. त्याचे दुष्परिणाम म्हणजे करोनासारखे दिवस आपल्याला दिसत आहेत. मात्र आता जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचा विचार करावाच लागेल.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री