लांब पल्ल्यांच्या प्रवासाकरिता दोन-तीन महिन्यांपासून तिकीट काढून ठेवलेल्या प्रवाशांना १ नोव्हेंबपासून गाडय़ांच्या वेळांमध्ये झालेल्या बदलाविषयी कळवण्यात न आल्याने त्यांचा गोंधळ उडाला.

नागपुरातून सुटणारी विदर्भ एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस आणि नागपूरमार्गे धावणाऱ्या सहा गाडय़ांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळात बदला झाला आहे. यासंदर्भातील कल्पना प्रवाशांना आणि प्रवाशांशी संबंधित विविध खात्यांना एक आठवडा आधीच देणे अपेक्षित होते. परंतु हे वेळापत्रक लागू केल्यानंतर त्याची पूर्वसूचना देण्याचा विसर रेल्वेला पडल्याने प्रवाशांमध्ये आज गोंधळ दिसून आला.

मागील दोन महिन्यांपासून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांवर १ नोव्हेंबरपासून वेळापत्रक बदलणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी त्यासंदर्भातील खात्री करून द्यावी, असा एक ओळीचा मजकूर त्यात होता. आज प्रवास करणारे प्रवासी विविध गाडय़ांच्या वेळेबाबत चौकशी करताना दिसून आले. १ आणि २ नोव्हेंबरला नागपूर येथून विविध गाडय़ांचे आरक्षण असलेल्यांना वेळापत्रकात काय बदल झाला. याबद्दलची माहिती मिळत नव्हती. रेल्वेच्या चौकशी दूरध्वनीच्या क्रमांकावर देखील माहिती मिळत नव्हती.

यंदा पहिल्यांदाच १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले. यापूर्वी १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येत होते. तसेच वेळापत्रक लागू होण्याच्या एक आठवडापूर्वी त्यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येत होते. यावेळी मात्र गाडय़ांची सर्व माहिती ठेवणाऱ्या स्थानक उप अधीक्षकांना देखील बदलाची कल्पना देण्यात आली नाही. स्थानकावरील चौकशी केंद्राला देखील याबद्दलची माहिती नव्हती. साधारणत: रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी थेट संबंध येणारी व्यक्ती म्हणजे तिकीट तपासणीस असते. चौकशी केंद्रावर, तिकीट तपासणीस आणि स्थानक उपअधीक्षक कार्यालयात गाडय़ांच्या वेळांच्या बदलाची माहिती नव्हती.

यासंदर्भात सेवाग्राम एक्सप्रेसने आज प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशांने लोकसत्ताशी बोलताना या गैरसोयीबद्दल तक्रार केली. १ नोव्हेंबरपासून गाडय़ांच्या वेळांतबदल होणार असे तिकीटमध्ये नमूद आहे. परंतु त्यासंदर्भातील माहिती प्रवाशांना मिळणे सोपे नाही. रेल्वेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला, पण तिथून नीट माहिती मिळाली नाही. त्यामुळे नातेवाईकांना सांगून गाडीच्या वेळेबाबत इंटरनेटवर काय माहिती मिळते ते बघण्यास सांगितले. त्यानंतर सेवाग्राम एक्सप्रेसच्या वेळेत बदल झाला नसल्याचे कळले. परंतु गाडीच्या वेळेत बदल झाला की नाही. याबद्दलची माहिती नसल्याने सकाळपासूनच तणाव होता, असे मंगळवारी मुंबईकडे रवाना झालेल्या माया कडू म्हणाल्या.

भ्रमणध्वनीवर लघुसंदेश नाही

रेल्वे तिकीट आरक्षण फार्मवर प्रवाशांचा भ्रमणध्वनी नमूद असतो. तिकीट कन्फर्म झाल्याची तसेच इतर माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळणे अपेक्षित आहे. परंतु नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर त्या बदलाची माहिती रेल्वे प्रवाशांना लघुसंदेशाद्वारे कळवण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी गाडय़ांच्या वेळांबाबत संभ्रावस्थेत होते आणि रेल्वेशी संबंधित लोकांना फोन लावून त्यासंदर्भात चौकशी करीत होते. रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाची माहिती इंटरनेटवर शोधत होते.

वेळात झालेला बदल

नवीन वेळापत्रकानुसार मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून १९.१० वाजता ऐवजी १९.०५ ला निघेल. नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस मुंबईला सकाळी ७.५५ ऐवजी सकाळी ८.०५ ला पोहोचेल. नवी दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस नागपूरला दुपारी १४.१५ ऐवजी १४.०० वाजता येईल आणि दुपारी अडीच ऐवजी १४.१० ला नागपुरातून निघेल. जयपूर-कोईंबतूर साप्ताहिक एक्स्प्रेस आणि जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आठवडय़ातून दोन दिवस धावणारी गाडी तसेच चेन्नई-जयपूर एक्सप्रेस नागपूरला दुपारी १४ ऐवजी १३.५० वाजता येईल आणि नागपूरहून दुपारी १४ वाजता ऐवजी दुपारी १४.१० वाजता निघेल.