मालकाने चोरीचा आरोप लावल्याने टोकाचे पाऊल

नागपूर : मालकाने चोरीचा आरोप केल्यानंतर ट्रकचालकाने पोलीस ठाण्यासमोरच ट्रकमध्ये ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना नागपूर ग्रामीण भागातील कोंढाळी पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अशोक जितूलाल नागोत्रा  (४८) रा. शेंडेनगर असे मृताचे नाव आहे. अशोक  हा वाहतूकदार राजेंद्र चौहान यांच्याकडे गेल्या २० वर्षांपासून चालक म्हणून काम करायचा. १२ जूनला अशोक  एमएच-०४, जीआर-२७७४ क्रमांकाच्या ट्रकने तेलाचे पिंप घेऊन मुंबईला निघाला. बाजारगाव परिसरात ट्रकमधील डिझेल संपल्याने त्याने पेट्रोल पंप परिसरात ट्रक उभा केला. यादरम्यान ट्रकमधून तीन लाख ६८ हजार रुपये किमतीचे तेलाचे पिंप चोरी गेले. राजेंद्र चौहान यांनी कोंढाळी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अशोकविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, ट्रक पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला. पोलीस तपास करीत होते व अशोक ट्रकसह पोलिसांना सर्व सहकार्य करीत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने ट्रकच्या कॅबीनला तार बांधून गळ्यात अडवला व आत्महत्या केली. पोलिसांनी अशोक हा पळून गेला असावा, असे वाटले.  पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा तपास सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर करीत आहेत.