महेश बोकडे

करोना मृत्युदर अधिक असलेल्या राज्यातील काही जिल्ह्य़ांत केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने नुकतीच भेट दिली. त्यात अमरावती विभागातील काही रुग्णालयांत अत्यवस्थ करोनाबाधितांच्या व्हेंटिलेटर व्यवस्थापनात गंभीर दोष आढळले. त्यामुळे पथकाने नागपूरच्या तज्ज्ञांना तेथे प्रशिक्षण देण्याची सूचना केली.

या पथकात इंटिग्रेटेड डिसिज सव्‍‌र्हिलन्स कार्यक्रमाचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंग, उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी आणि डॉ. रजनीश कौशिक यांचा समावेश होता. हे पथक ७ फेब्रुवारीला अमरावती येथे पोहचले. अमरावती, अकोला, यवतमाळ या तीन जिल्ह्य़ांचा आढावा घेताना तेथील काही रुग्णालयांतील तज्ज्ञांना व्हेंटिलेटर व्यवस्थापन योग्यरीत्या कळत नसल्याचे निदर्शनात आले. त्यावर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारीला हे पथक  नागपूर आणि भंडारा जिल्ह्य़ाचा आढावा घेण्यासाठी आले. येथील बैठकीत त्यांनी तज्ज्ञांना अमरावती विभागातील रुग्णालयांचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर व्यवस्थापन शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना केली. त्यामुळे करोना भरात असताना तेथे अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर लावताना काही चुका झाल्या का, हा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पथकाची निरीक्षणे..

काही रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्णांना सलाईनने औषध देण्यासाठी शरीरात सेंट्रल लाइन टाकण्याबाबतचेही कौशल्य काहींना अवगत नव्हते, असे पथकाला आढळून आले. व्हेंटिलेटर हाताळणी, इको, ईसीजी याबाबतही काही ठिकाणी ज्ञान अपुरे दिसले.

अकोला, नागपुरात सर्वाधिक मृत्युदर

अकोला जिल्ह्य़ात सर्वाधिक ३.३३ टक्के तर नागपूर जिल्ह्य़ात ३.०७ टक्के करोना मृत्युदर आहे. त्यात नागपुरात उपचार घेतलेल्या जिल्ह्य़ाबाहेरील ७१४ मृत रुग्णांचाही समावेश आहे. ही संख्या वजा केल्यास येथील मृत्युदर अडीच टक्केच्या जवळपास येतो.  यवतमाळ २.७८ टक्के, भंडारा २.२६ टक्के तर अमरावतीचा मृत्युदर १.७२ टक्के आहे.

केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार अमरावतीतील डॉक्टर- तंत्रज्ञांना नागपुरातील मेडिकल, मेयोत प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. ग्रामीण व लहान शहरात व्हेंटिलेटर हाताळणी, इको, ईसीजी, सेंट्रल लाइन टाकण्याबाबतची फारशी माहिती नसते. अकोला आणि यवतमाळला वैद्यकीय महाविद्यालय असल्याने तेथे ही समस्या नाही.’’

-डॉ. राजकुमार चव्हाण, प्रभारी आरोग्य उपसंचालक, अकोला.