व्हीएनआयटी विद्यार्थ्यांची हॅकेथॉनमध्ये बाजी

नागपूर : निवासी सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर  मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे नियंत्रण  ठेवणारे सॉफ्टवेअर तयार करून व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी  हॅकेथॉन २०१९मध्ये बाजी मारली. बनारस हिंदू विद्यापीठातील हॅकेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने आज ही चमू देशातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

नागपुरातच नव्हे तर देशातील मोठी शहरे, उपनगरे यामध्ये दोन चाकी, चारचाकी गाडय़ांना ठेवण्यासाठी वाहनतळ असणे फारच गरजेचे झाले आहे. शहरे वाढत असून शहरांच्या सीमावर्ती भागातून शहरांच्या मध्यवर्ती भागात नोकरी, रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वच शहरांमध्ये वाढलेली आहे. रुग्णालये, चित्रपटगृह, मॉल, सोसायटी यामध्ये वाहनतळासाठी जागा सोडणे अलीकडे नियम करून सक्तीचे करण्यात आले आहे. अशा या सार्वजनिक आणि सार्वत्रिक समस्येवर व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी तोडगा शोधून काढला.

सोसायटीमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडय़ांचे नियंत्रण सामान्य माणसाला परवडेल अशा दरात मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे नियंत्रित करणे शक्य असल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. व्हीएनआयटीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या (बी. टेक.) विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ या सॉफ्टवेअर बनवण्याच्या स्पर्धेत सुयश संपादित केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या  अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, एमआयसी, नागपुरातील परसिस्टंट, १४सी आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.