मूळचे गोंदिया जिल्ह्य़ातील आणि नागपुरात स्थायिक झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) सहायक उपनिरीक्षक म्नरेश उमराव बडोले यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण झाले. त्यांच्या पार्थिवावर डिगडोह स्मशान भूमीवर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला आणि दोन मुली मृणाल (२३) आणि प्रज्ञा (२०) आहेत.

४९ वर्षांचे नरेश बडोले सीआरपीएफ ११७ बटालियनमध्ये होते. जम्मू-काश्मीरमधील बडगाव जिल्ह्य़ातील चाडूरा येथे ते तैनात होते. ते कर्तव्यावर असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकीस्वार दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण, त्यांची प्राणज्योत मालवली.

ते विदर्भातील गोंदिया जिल्ह्य़ातील बामणी गावचे मूळ रहिवासी होते. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले नरेश १९८९ मध्ये सीआरपीएफला रूजू झाले.  शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.