|| महेश बोकडे

विधानसभा निवडणुकीत शहरातील सहाही मतदारसंघातील एकूण ८४ उमेदवारांपैकी ६३ टक्के उमेदवारांना एक हजाराहून कमी मते मिळाली आहेत. सर्वाधिक उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आहेत. बारा टक्के जणांना दोन अंकी मतांवरच समाधान मानावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या उपराजधानीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, वंचित, एमआयएमसह विविध पक्ष आणि अपक्ष असे एकूण ८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

सर्वच उमेदवारांनी संबंधित मतदारसंघात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचून प्रचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मतमोजणीत भाजपने चार तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला. सहाही मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत ६३ टक्के उमेदवारांना एक हजाराहून कमी मते मिळाली.

निकालानुसार बारा टक्के म्हणजे दहा उमेदवारांना दोन अंकी मतांवरच समाधान मानावे लागले. शहरातील एक हजाराहून कमी मते मिळवणाऱ्या मतदारसंघात पश्चिमचे ७, पूर्व ४, दक्षिण ३, उत्तर ९, मध्य नागपूरच्या ८ आणि दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील १५ उमेदवारांचा समावेश आहे, तर मुख्यमंत्री उमेदवार असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात तब्बल ६ उमेदवारांना दोन अंकी मतांवरच समाधान मानावे लागले, तर दक्षिण नागपूरच्या ३ आणि पश्चिमच्या एका उमेदवाराला दोन अंकी मतेच मिळाली.

मतदारसंघ    उमेदवार

  • पश्चिम                   १२
  • पूर्व                          ०८
  • दक्षिण                     0७
  • उत्तर                       १४
  • मध्य                        १३
  • द.- पश्चिम              २०
  • एकूण       –              ८४