नागपुरात आज (सोमवार) विदर्भवादी कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणावेळी घोषणाबाजी करून अडथळा निर्माण करत गोंधळ घातला. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी यावेळी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. पोलिसांनी या आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर गडकरी यांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावेळी हा प्रकार घडला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते.
..असे उचक्के बरेच असतात
सामंजस्य करार झाल्यानंतर गडकरी हे बोलण्यास उभारले. त्यावेळी अचानक उपस्थितांमध्ये बसलेल्यांमधून वेगळ्या विदर्भाची मागणी करत घोषणाबाजी करण्यात येऊ लागली. अचानक घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे आयोजकांनाही धक्का बसला. त्यावेळी गडकरी हे काही क्षण थांबले. नंतर पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. इतक्यावरच न थांबत ते म्हणाले, ही काही नवीन गोष्ट नाही. असे उचक्के बरेच असतात, असा टोला लगावत आपले भाषण सुरूच ठेवले.
यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या विदर्भासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली होती.