रडार बंद पडल्याने अनेकदा भाकित चुकले

नागपूर : उपराजधानीतील हवामान यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. या हवामान केंद्राकडून अचूक अंदाजाची अपेक्षा करता येत नाही. पावसाळ्यात अनेकदा केंद्राचे रडार बंद पडल्याने कित्येकदा चुकीचे अंदाजही दिले गेले आहेत. उपराजधानीतील तापमानाचा चढता पारा पाहता याठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागात हवामान केंद्र अपेक्षित आहे. मात्र, ते शहराच्या एका टोकाला विमानतळ परिसरात असल्याने  शहराच्या अचूक तापमानाचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे.

उष्माघाताच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान नियंत्रण आपल्या हातात नसले तरीही त्यासाठी काही उपाययोजना करणे शक्य आहे. त्यासाठी वाढते तापमान आणि हवामानाचा अचूक अंदाज अपेक्षित आहे. शहरातील एकमेव हवामान केंद्र हे शहराबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक आहे. त्यामुळे तेथून शहराच्या तापमानाबाबत घेतल्या जाणाऱ्या अंदाजात बराच फरक पडतो. पावसाळ्यात देखील हाच प्रकार घडतो. विमानतळ परिसरात पाऊस नेहमीच अधिक पडतो आणि तुलनेने शहरात तो कमी पडतो. मात्र, या केंद्रातून वर्तवण्यात येणारे अंदाज हे विमानतळ परिसरातील पावसाच्या वातावरणानुसारच येतात. त्यामुळे शहरातील अचूक तापमानाचा वेध घेण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात तशी यंत्रणा हवी. काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर रुग्णालय परिसरात एक केंद्र होते, पण आता त्याचा थांगपत्ता नाही. शहराचे तापमान मोजणारी यंत्रणा अत्यावश्यक आहे, कारण त्यातून मिळणाऱ्या तापमानाच्या अंदाजावरून उष्माघात टाळण्यासाठी  उपाययोजना करता येते. नागपूर शहराचे तापमान गेल्या काही वर्षांत ४५ अंश सेल्सिअसपलीकडे जात आहे. या शहराजवळ प्रादेशिक हवामान केंद्र, रिमोट सेन्सिंग केंद्र आहे. त्यातून आठवडाभराच्या तापमानाची माहिती मिळाली तर उष्माघाताच्या बळींची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना आखता येतील, पण ही केंद्रच अलीकडे बेभरवश्याची झाली आहेत. उपराजधानी देशाचा केंद्रबिंदू असतानाही याठिकाणी असणाऱ्या यंत्रणा तोकडय़ा आहेत. तापमानाची अचूक आणि वेळेवर माहिती मिळाली तर उष्माघात कृती आराखडय़ात त्यानुसार उपाय आखता येतात. शहरात स्वयंचलित हवामान केंद्र लावले तरीही बराच फरक पडू शकतो. विमानतळावर धावपट्टीच्या बाजूला असे केंद्र आहे आणि त्याचा उपयोग पायलटला हवामानाचा अंदाज यावा यासाठी होतो. तसेच केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात लावले तर शहरातील तापमानातील बदल कळू शकतील. मुख्य हवामान यंत्रणेतील माहितीत ते गणले जात नसले तरीही शहराच्या तापमानाचा अंदाज आल्याने वाढत्या तापमानाच्या धोक्यावर उपाययोजना नक्कीच आखता येतील.

अहमदाबादचा आदर्श घ्यावा

गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेने उष्माघातावर आधारित प्रकल्प सुरू केला आहे. २०१० मध्ये  उष्माघात लाटेत सुमारे ३०० बळी गेले होते. त्यानंतर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि २०१४ मध्ये त्यावर प्रत्यक्ष काम करण्यात आले. त्यावेळी उष्माघाताच्या बळींची संख्या कमी होऊन ७० वर आली होती. उष्णतेची लाट येण्यापूर्वीच त्याठिकाणी उपाययोजना आखण्यात येतात. कारण अमेरिकेतील टेक या संस्थेतर्फे शहराला तापमानाची पूर्वसूचना मिळते. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यात ४१ अंश सेल्सिअस तापमान असेल तर पांढरा अलर्ट, ४३ असेल तर ऑरेंज आणि ४५ असेल तर रेड अलर्ट देऊन तातडीने हालचाली करण्यात येतात.