हवामान, शिकार, तलावातील शेतीचा परिणाम
हवामानातील बदल, शिकारीच्या प्रमाणात वाढ आणि तलावाच्या आत होणारी शेती यामुळे पाणवठय़ांवरील पक्ष्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. पाणवठय़ावरील पक्षीगणनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्याच टप्प्यात तब्बल एक तृतीयांश घट झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात सुमारे १५०००च्या संख्येत पक्ष्यांची नोंद पाणवठय़ावर करण्यात आली. तर यावर्षी केवळ दहा हजाराच्या संख्येत पक्ष्यांची नोंद झाल्याने पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.
बर्ड्स ऑफ विदर्भच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील पाणवठय़ावरील वार्षिक पक्षीगणनेचा पहिला टप्पा प्रादेशिक वनखात्याच्या सहकार्याने रविवार, २० डिसेंबरला पार पडला. जिल्ह्यातील सुमारे ३३ तलावांवर ही पक्षीगणना करण्यात आली. गणनेदरम्यान २० चमूमध्ये सुमारे ६३ पक्षीनिरीक्षक व पर्यावरणप्रेमी सहभागी होते. पाणवठय़ावरील पक्षीगणनेत सुमारे ७८ प्रजातीची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पक्ष्यांची नोंद अमरावती मार्गावरील वेणा प्रकल्पावर १४५१ इतकी असून, सर्वात कमी पक्ष्यांची नोंद हिंगणा मार्गावरील भीवकुंड तलावावर २३ इतकी झाली. अमरावती मार्गावरील सुराबर्डी तलावावरील चमूने डॉ. डापके व निमीष काणे यांनी तलावाची पातळी अतिशय घसरल्याचे नमूद केले. फुटाळा तलावाचेही प्लॅस्टिक व निर्माल्यामुळे अध:पतन होत असल्याचे यवेळी निदर्शनास आले. वेणा तलावावर रोपवाटिका व धरणाच्या बाजूने हजारोंच्या संख्येत रेड क्रिस्टेड पोचार्ड (मोठी लालसरी बदक) असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. उकरवाही तलावावर ३२० पेक्षा अधिक पट्टकदंब हंस (बार हेडेड गीज) तसेच २०० पेक्षा अधिक तलवार बदक (नॉर्दन पीनटेल) आढळून आले. ब्लॅक स्टॉर्क हे कमी होत चाललेले पक्षी खापरी तसेच कोलारमेट या तलावावर आढळून आले. प्राची माहूरकर यांना उंद्री तलावावर मिश्र रुपात पाणपक्षी आढळून आले. हुडकेश्वर मार्गावरील मटकाझरी, वडद तलावावर पक्ष्यांची संख्या चांगल्या प्रमाणात असल्याचे निरीक्षण मराठे व लोंढे यांनी नोंदवले. विशेष म्हणजे या पक्षीगणनेत जम्मू आणि काश्मिरचे ताहीर गझनफार तसेच कोलकात्याचे सुमीत सेन शर्मा यांनीही सहभाग नोंदवला.
नागपूर जिल्हा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहे. हिमालय पर्वतरांगा, मंगोलिया, सायबेरिया आणि त्याही पलीकडून स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येत असतात. पक्षीगणनेची आकडेवारी संशोधनाकरिता तसेच पर्यावरण व त्याचे संरक्षणाकरिता तयार करण्यात येणाऱ्या शासकीय धोरणाकरिता उपयोगी पडते. दरवर्षी ही पक्षीगणना वनखात्याच्यावतीने आयोजित करण्यात येत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत वनखात्याचे या एका चांगल्या उपक्रमाकडे दुर्लक्ष झाले आणि पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी पाणवठय़ावरील पक्षीगणनेची धुरा आपल्या अंगावर घेतली.
या पक्षीगणनेत सहभागी झालेल्या निरीक्षकांच्या मदतीसाठी छोटा ताजबाग, सक्करदरा येथील देवश्री फोटोग्राफिक सव्‍‌र्हिसेस येथे बर्ड्स ऑफ विदर्भाच्यावतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. तसेच यात रामदेवबाबा इंजिनिअर्स फॉर एनव्हायर्नमेंट फोरमचे ‘ग्रीन अ‍ॅम्बेसीडर’ व पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. पक्षीगणनेच्या या कार्यात अविनाश लोंढे, सुरेंद्र अग्निहोत्री, नितीन मराठे, विनीत अरोरा, संकेत धाराशिवकर, संजय खोलिया, रोहीत चक्रवर्ती तसेच मानद वन्यजीव रक्षकांचे मोलाचे योगदान राहिले.