पाचपावलीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा

नागपूर :पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आलेल्या तरुणाच्या आत्महत्येला आता वेगळी कलाटणी मिळाली असून त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी याप्रकरणी खुनाचे कलम वाढवून प्रियकरास अटक केली आहे.

मनीषा पंकज अंभोरे (३०) आणि अरुण मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. पंकज चंद्रकांत अंभोरे (३४) रा. व्यंकटेश्वरनगर असे मृताचे नाव आहे. पंकज हा एका खासगी कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करीत होता. पत्नी मनीषासह फ्लॅटमध्ये राहात होता. मनीषाला दारूचे व्यसन होते. तिचे अरुणशी अनैतिक संबंध होते. मनीषा आणि अरुण यांच्या भेटी वाढल्यामुळे त्याची  माहिती पंकजला मिळाली होती. त्याने मनीषाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण, अरुणने मनीषाच्या सांगण्यावरून पंकजची भेट घेऊ न त्याला संपवण्याची धमकीही दिली होती. ५ डिसेंबरच्या रात्री कारने जात असताना कामठी मार्गावर शिल्पा रोलिंग कंपनीसमोर पंकज जखमी अवस्थेत  मनीषाला दिसला. तिने डॉक्टरला अपघात झाल्याचे सांगितले तर नातेवाईकांना पंकज नाल्यात पडल्याचे सांगितले. पोलिसांना मात्र स्वत:च डोक्यात दगड मारून आत्महत्या केल्याचे सांगितले. मनीषाच्या सांगण्यावरून पाचपावली पोलिसांनी प्रथम आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनीषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला व तिला अटक केली.

दरम्यान, मनीषाने आपल्या प्रियकरासह मिळून त्याचा खून केला असून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंकजच्या आईवडिलांनी केली व पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी तपास केला व पुराव्यावरून प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मिश्रा याला अटक केली. मिश्रा याचे सर्व नातेवाईक पोलीस विभागात कार्यरत असून खुनाचा गुन्हा दाबण्यासाठी त्याने एका उपायुक्तांशी अर्थपूर्ण व्यवहार केले होते, असेही आरोप होत आहेत.

खुनापूर्वी तिघेही एकत्र होते

खून होण्यापूर्वी पंकज, मनीषा आणि अरुण हे तिघेही एकत्र होते. पंकजने  दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ते समजण्याच्या पलीकडे असल्याने त्यांनी संगनमत करून पंकजला सोबत नेले व दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दगडाने मारल्यामुळेच पंकजचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. तसेच अरुण व मनीषाच्या कॉल डिटेल्स बघितले असता खुनानंतरही ते सोबत असल्याचे  दिसते. या आधारावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मिश्राला अटक केली, तर मनीषा ही कारागृहात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.