नागपूर-जबलपूर रस्त्यावरील खास सुविधेचे नियोजनशुन्यतेमुळे डबक्यात रुपांतर

नागपूर : राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात येणारे भुयारी मार्ग कसे असावेत, याचे उत्तम उदाहरण शेजारच्या मध्यप्रदेश वनखात्याने समोर ठेवले असताना त्याच महामार्गाच्या महाराष्ट्राच्या अखत्यारितील  काही भुयारी मार्गाना मात्र गळती लागली आहे.  हे मार्ग बारमाही डबक्यांमुळे वन्यप्राण्यांसाठी अडथळा ठरत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सातवर वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाची नवव्या   क्रमांकाची रचना सुरुवातीपासूनच अडथळ्यांची ठरली आहे. नागपूरहून जबलपूरकडे जाताना मनसरपासून काही अंतरावर चोरबाहुलीच्या आधी ही नवव्या क्र मांकाची रचना आहे. याठिकाणी उजव्या बाजूला पाझर तलाव होता तर डावीकडून पेंचच्या जंगलातून त्याठिकाणी पाणी येत होते. वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार करताना जुन्याच पुलाचा वापर करण्यात आला. सृष्टी पर्यावरण मंडळाने या मुद्याकडे लक्ष वेधल्यानंतर न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. या मार्गावरील पुलाची रचना चौकोन नाही तर रुंद असायला हवी, हे सृष्टी पर्यावरण मंडळाने न्यायालयात सांगितले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आम्ही आजूबाजूला आणखी ते बनवून देऊ, असे सांगितले. वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना नियमानुसारच असायला हव्या, असे न्यायालयाने प्राधिकरणाला स्पष्ट शब्दात सुनावले. त्यानंतर प्राधिकरणाने ही नवव्या क्र मांकाची रचना केली. ती करतानाही प्राधिकरणाने पळवाट शोधली. तीन मीटरच्या किमान मंजुरीसाठी खर्च आणि वेळ वाढला असता. तो टाळण्यासाठी हा भुयारी मार्ग तयार करताना त्याच ठिकाणी तीन मीटरचे खोदकाम करण्यात आले. त्याचा राडारोडा तलाव आणि रचनेच्यावर टाकण्यात आल्याने  आजूबाजूला उंचवटे आणि मध्ये खड्डा तयार होऊन पाणी साचत गेले. न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना न्यायालयाचे पथक, सृष्टीचे पदाधिकारी तसेच वनखाते व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी संयुक्त पाहणी के ली. यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पाणी जमा होणार नाही, अशी यंत्रणा उभारली जाईल आणि नैसर्गिक स्त्रोत कायम राखला जाईल, असेही सांगितले. मात्र तसे झालेले नाही.

दोन राज्यांतील नियोजनाचा फरक

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सात हा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जातो. त्याठिकाणी वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, हे मार्ग तयार होताना मध्यप्रदेश वनखात्याने स्वत: त्यात लक्ष घातले. भुयारी मार्गाच्या बाजूला आवाजप्रतिरोधक अडथळे (नॉईज बॅरिअर) लावून घेतले. ज्यामुळे भुयारी मार्गाच्या वरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज जंगलात कमी जातो. तसेच वाहनांच्या दिव्यांचा प्रकाशझोत कमी होतो. परिणामी, वन्यप्राणी यशस्वीरित्या या मार्गाचा वापर करतात. महाराष्ट्रातील याच महामार्गावर अशी कोणतीही व्यवस्था नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.