राज्यातील संरक्षित व राखीव वन्यजीव, प्रादेशिक वनक्षेत्रात वनखाते सज्ज

चंद्राच्या प्रकाशात बुद्ध पौर्णिमेला जंगलातील पाणवठय़ावर केली जाणारी वन्यप्राणी गणना, आधुनिक वन्यप्राणी गणनेच्या पद्धतीत थोडी जुनी ठरत चालली आहे. तरीही पारंपरिक आणि अत्याधुनिक वन्यप्राणी गणनेचा मिलाफ वन्यप्राणी गणनेनिमित्त पाहायला मिळत आहे. या गणनेसाठी होणाऱ्या ऑनलाईन नोंदणी पद्धतीला राज्यातील वन्यजीवप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद यावेळी मिळाला असून प्रादेशिक विभागातही मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राणी गणनेसाठी मचाणी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गणनेकडे यंदा सर्वाचेच लक्ष लागले आहे.

कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झिट मेथड या अत्याधुनिक वन्यप्राणी गणनेत ही पारंपरिक गणना झाकोळली गेली. तरीही या गणनेला आता प्रगत तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. अधिकाधिक वन्यजीवप्रेमी आणि सामान्य नागरिकांना या गणनेविषयी माहिती व्हावी आणि सहभागी होता यावे म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पहिल्यांदा ‘ऑनलाईन नोंदणी’ला सुरुवात झाली. यात वन्यजीवप्रेमी किंवा नागरिकांनी घेतलेल्या नोंदी वनखात्याकडे जमा केल्या जातात. मात्र, अभ्यासात गृहीत धरली जात नाही. तरीही राज्यभरातच वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्र प्रकल्प आणि सर्वाधिक अभयारण्येसुद्धा विदर्भात आहेत. त्यादृष्टीनेच गणनेसाठी तयारी करण्यात आली असून मचाणी उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील वन्यजीव आणि

प्रादेशिक क्षेत्रासोबतच राखीव जंगलातसुद्धा ही गणना करण्यात येत आहे. यात सुरुवातीला नि:शुल्क सहभाग नोंदवून घेतला जात असला तरीही अलीकडच्या काही वर्षांत मात्र ५०० ते १०० रुपयांपर्यंत निधी आकारण्यात आल्यानेदरम्यानच्या काळात त्यावर टीकादेखील झाली होती. तरीही दरवर्षी स्वयंसेवकांचा सहभाग वाढत आहे.

  • पेंच व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी ८०० अर्ज, त्यामुळे नोंदणी बंद.
  • विदर्भात ११६१ पाणस्थळांवर वन्यप्राणी गणना, १२४१ स्वयंसेवकांचा सहभाग.
  • वन्यजीवप्रेमींचा कल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे अधिक.
  • महिला स्वयंसेवकासाठी यंदा काही मचाण राखीव, १८ वषार्ंखालील स्वयंसेवकांना सहभाग नाही.
  • मेळघाट ५०१, ताडोबा १९२, पेंच ३३७, नवेगाव-नागझिरा १३१.

कुठे कोणते प्राणी दिसतात?

  • भीमाशंकर- हे अभयारण्य शेकरू खारींसाठीच ओळखले जाते. परंतु शेकरू पाण्यासाठी सहसा पाणवठय़ावर येत नाहीत. त्यामुळे भीमाशंकरमधील गणनेत मुख्यत: बिबटय़ा दिसतो का, याची उत्सुकता असते.
  • सुपे- चिंकारा, लांडगा
  • रेहेकुरी- काळवीट, लांडगा
  • नान्नज- लांडगा, खोकड, कोल्हा, तरस.b