मदतीसाठी तडफडत असतानाही कोणी धावले नाही

तांडापेठमधील अमोल गृह उद्योग प्रतिष्ठानाच्या समोर एका २५ ते ३० वयोगटातील अज्ञात तरुणाचा तीन आरोपींनी धारदार शस्त्राने भोसकून खून केला. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या युवकाला ही घटना बघणाऱ्यांनी साधे दवाखान्यात नेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. तडफडतच त्याचा मृत्यू झाला.

तुलाराम ऊर्फ लल्ला मदन धार्मिक (२१), रा. ठक्करग्राम, पाचपावली, चंद्रशेखर ऊर्फ चंदू रूपराव भिसीकर (२५), रा. तांडापेठ, बबन (१७) (बदललेले नाव) अशी आरोपींची नावे आहेत. भिसीकर हा अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वीचा एका खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो काही महिन्यापूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. मृत युवकाला दारूचे व्यसन होते. त्याने काही दिवसांपूर्वी एका आरोपीला अश्लील शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी त्याच्या खुनाचा कट रचला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी लोखंडी टोचा, लोखंडी साखळी घेऊन युवकाच्या मागावर होते. नाईक तलावाजवळ तो येताच त्याच्यावर टोचाने वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या युवकाला तसेच सोडून आरोपींनी पळ काढला.

दरम्यान, ही घटना घडत असताना तेथे लोकांचे येणे-जाणे सुरूच होते. सर्वादेखतच ही घटना घडली. मात्र, युवकाच्या मदतीला कोणीही धावून गेले नाही. सर्वजण बघत होते. काही महिला तर त्याच्या बाजूने निघून गेल्या. एका मुलाने येथे येऊनही त्याला मदत केली नाही. जखमी अवस्थेत त्या युवकाने दोन वेळा उठण्याचा प्रयत्न केला, पण रक्तस्राव अधिक झाल्याने त्याला शक्य झाले नाही.  शेवटी त्याचा तडफडून मृत्यू झाला. हा सर्व घटनाक्रम बाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली.

गुन्हेगारांना कुणाची भीती नाही?

तांडापेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यांवर लोकांची ये-जा सुरू असताना आरोपींनी सगळ्यांच्या समोर युवकाची हत्या केली. यामुळे गुन्हेगारांवर कोणाचाच वचक उरला नाही हे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांचे अपयश

शनिवारी मध्यरात्रीनंतर तांडापेठमध्ये ही घटना अनेक नागरिकांच्या समक्ष घडली. मात्र तरीही पोलिसांना ही माहिती सकाळी ६ वाजता मिळाली. ‘बीट’ पद्धतीमुळे लगेच माहिती मिळते, असा दावा नेहमी पोलिसांकडून केला जातो. या प्रकरणात ही पद्धतही सपशेल अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.