शासकीय दंत महाविद्यालयात यशस्वी शस्त्रक्रिया

नागपूर : अमरावतीत शिकणाऱ्या एका युवकाच्या जबडय़ाला अडीच वर्षांपूर्वी दुर्मिळ आजार झाला. पहिली शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. सुमारे अडीच वर्षे तोंड न उघडण्याचा त्रास सहन केल्यावर उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे तो उपचाराला आला. तीन दिवसांपूर्वी त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सोमवारी त्याने प्रथमच अडीच वर्षांनी आपले तोंड उघडले. यावेळी त्याच्या डोळ्यातून  आनंदाश्रू तरळले.

निखिल ईश्वर गवई (१९) रा. अमरावती असे युवकाचे नाव आहे. तो बी.कॉम. प्रथम वर्षांला दारापूर येथील महाविद्यालयात शिकतो. त्याचे वडील मजूर असून आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. अडीच वर्षांपूर्वी त्याच्या चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर त्याचे तोंडच उघडत नव्हते. त्याने सावंगी येथील रुग्णालयात  शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याचे तोंड उघडले. परंतु पंधरा दिवसांतच त्याला पुन्हा तोंड न उघडण्याचा त्रास सुरू झाला.  जगण्यासाठी हा तरुण कसेतरी पातळ पदार्थ पोटात ढकलत होता.

रुग्णाच्या नातेवाईकाने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात उपचाराचा सल्ला दिला. येथे दंत शल्यचिकित्सक प्रा. अभय दातारकर यांनी त्याला बघितले. विविध तपासणीत त्याला जॉ फ्युज झाल्याचा आजार असल्याचे पुढे आले. नातेवाईकाच्या सल्ल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय झाला.

शुक्रवारी या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात जबडय़ातील एक  हाड कायमचे काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी या रुग्णाचे तोंड सुमारे २.५ सेंटीमीटरने उघडले. त्यानंतर या युवकाने सोजी खाल्ली. ही समस्या पुन्हा उद्भवणार नसल्याचे कळताच युवकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू डबडबले. ही शस्त्रक्रिया डॉ. अभय दातारकर यांच्या नेतृत्वात डॉ. सुरेंद्र डावरे, डॉ.अर्चना देशपांडे, डॉ. सूरज, डॉ. अमित, डॉ. शमा यांनी केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. संजय भुले आणि डॉ. पल्लवी यांचे सहकार्य मिळाले.

‘फायब्रो ऑप्टिक ब्रोकोस्कोप’चा वापर

दंत महाविद्यालयाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नुकतेच फायब्रो ऑप्टिक ब्रोकोस्कोप हे यंत्र मिळाले आहे. या यंत्रातून दुर्बिण असलेल्या पाईपच्या माध्यमातून नाकावाटे श्वसन नलिकेत जाऊन रुग्णावर प्रक्रिया केली जाते. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी लागलेल्या या यंत्राचा या शस्त्रक्रियेसाठी प्रथमच वापर झाला.

‘‘या रुग्णाचे तोंडच उघडत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्याचे तोंड सुमारे २.५ सेंटीमीटपर्यंत उघडायला लागले आहे. त्याला  व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारपासून त्याचा चॉकलेट खाण्याचा सराव सुरू झाला.’’

– प्रा. डॉ. अभय दातारकर, दंत शल्यचिकित्सक.