वादळ, पावसामुळे मागणी घटल्याचा परिणाम;  २१ हजार मेगावॅटची मागणी ११,६२४ मेगावॅटवर

महेश बोकडे

राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अचानक तापमान कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात २१ हजार मेगावॅटवर गेलेली राज्यातील विजेची मागणी केवळ ११,६२४ मेगावॅटवर आली आहे. त्यामुळे महानिर्मितीला कोराडी, नाशिक, परळी, भुसावळ या चारही औष्णिक विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाली आहे.

टाळेबंदीमुळे सगळेच उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याने विजेची मागणी घटली होती. परंतु उन्हाळ्यात  कुलर, वातानुकूलित यंत्र व पंख्यांचा वापर वाढले विजेची मागणी थोडी वाढली. दरम्यान शासनाने उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू करण्याची मुभा दिली. उद्योग सुरू झाल्याने गेल्या आठवडय़ात राज्यातील विजेची मागणी २१ हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. मागणी वाढल्याने महानिर्मितीच्याही जवळपास सगळ्याच प्रकल्पातून कमी-अधिक वीजनिर्मिती सुरू झाली होती.

दरम्यान, काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे अचानक तापमान घसरल्याने विजेची मागणी तब्बल १० हजार मेगावॅटने कमी झाली. मेरिट ऑर्डर डिस्पॅच नियमानुसार, जास्त वीज दर असलेल्या संचातून प्रथम निर्मिती बंद केली जाते. त्यानुसार महानिर्मितीच्या नाशिक, कोराडी, परळी, भुसावळ या प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद केली गेली. स्टेट लोड डिस्पॅच सेंटरच्या संकेतस्थळानुसार, ४ जूनच्या दुपारी २.१० वाजता राज्यात विजेची मागणी ११ हजार ६२४ मेगावॅट होती. यापैकी केंद्राच्या वाटय़ातून राज्याला ३,५०० मेगावॅट वीज मिळत होती तर महानिर्मिती व खासगी कंपनीकडून ८,१३० मेगावॅट वीज उत्पादन सुरू होते. त्यात महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून केवळ २,६७५ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून ४५ मेगावॅट उत्पादनाचा समावेश होता. अदानी प्रकल्पातून केवळ १,३२१ मेगावॅट, जिंदल प्रकल्पातून ७३४ मेगावॅट, एसडब्ल्यूजीजीएल प्रकल्पातून ८१ मेगावॅट उत्पादन झाले. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाची क्षमता तब्बल १०,१७० मेगावॅट आहे. सध्या राज्यात विजेची कमी मागणी असली तरी पुढे लवकरच वाढून सर्व संच सुरू होण्याची शक्यता महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने वर्तवली आहे.

वीज निर्मितीची सद्यस्थिती

महानिर्मितीच्या नाशिक केंद्रात २१० मेगावॅटचे ३ वीजनिर्मिती संच असून सर्वच बंद आहेत. कोराडी केंद्रात ६६० मेगावॅटचे तीन आणि २१० मेगावॅटचे २ संच असून सर्वच बंद आहेत. खापरखेडात २१० मेगावॅटचे ४ आणि ५०० मेगावॅटचा १ संच असून त्यातून ९५० मेगावॅट वीज उत्पादन सुरू आहे. पारसमध्ये १५० मेगावॅटचे २ संच असून त्यातून ३६८ मेगावॅट उत्पादन सुरू आहे. परळीत २५० मेगावॅटचे ३ आणि २१० मेगावॅटचे २ संच असून सर्वच बंद आहेत. चंद्रपुरात २१० मेगावॅटचे ४ आणि ५०० मेगावॅटचे ५ संच असून यापैकी ३ बंद असून इतर संचातून १,३६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. भुसावळ केंद्रात २१० मेगावॅटचा १ आणि ५००  मेगावॅटचे २ संच असून सर्व बंद आहेत.