आमदार प्रकाश गजभियेंकडून सरकारला घरचा आहेर!

नागपूर : महावितरणमध्ये वीजहानीच्या नावाने १० हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. या कंपनीमुळे महाराष्ट्र अंधारात गेला आहे, असा आरोप राज्य वीज नियामक आयोगाच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच हा आरोप केल्याने त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.

आयोगाला गजभिये म्हणाले, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह इतर लहान राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात महाग वीज आहे. शेतकऱ्यांची थकबाकी महावितरणकडून ३० ते ३५ हजार कोटी रुपये असल्याचे दाखवले जाते. परंतु त्यात मुळ देयकावर व्याजावर व्याज लावल्याने ही रक्कम मोठी होते. अवास्तव देयकामुळे शेतकरी आत्महत्याचा धोका आहे. शासन विदर्भ आणि मराठवाडय़ात १२ हजार कोटींची सबसिडी देते. तिचे महावितरण काय करते हे कळत नाही. महानिर्मितीच्या तुलनेत खासगी व केंद्रीय कंपन्यांची वीज स्वस्त आहे.

राज्यातील वीजहानी व गळती १४ टक्के आहे. परंतु ती जास्त असून हा तब्बल १० हजार कोटींचा घोटाळा आहे. हा पैसा ग्राहकांकडून वसूल केला जातो. महावितरणकडून वीजचोरी थांबवण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाही. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपूर्वी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही अर्ज केले आहे. परंतु अनेकांना ते मिळाले नाही, असे प्रकाश गजभिये म्हणाले.

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार आहे. महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने व ऊर्जामंत्रीपद हे काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांच्याकडे असल्याने त्यांनी आपल्याच सरकारलाच घरचा अहेर दिला आहे.

३०० युनिटपर्यंत वीज नि:शुल्क करा

दिल्लीत वीज उत्पादन होत नसताना विजेचे दर महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आहे. तेथील सरकार ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज नि:शुल्क देते. तर महाराष्ट्रातही ३०० युनिटपर्यंत वीज ग्राहकांना नि:शुल्क देऊन जनतेला दिलासा देण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी सुनावणीत केली.