संशयितांचे नमुने पुण्याला पाठवले

नागपूर : जिल्ह्य़ात ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या नवीन प्रकाराच्या विषाणूचे १२ संशयित रुग्ण आढळल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सोमवारच्या बैठकीत पुढे आले. या सगळ्यांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले असून  अहवालानंतरच हा विषाणू ‘डेल्टा प्लस’ आहे की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, हे डेल्टा प्लसचेच रुग्ण असल्यास त्यांना मेडिकल- मेयोतील करोनाच्या वार्डात ठेवायचे की इतरत्र, त्यांच्यावर उपचार कसा होईल, याबाबत  मेडिकल- मेयोतील तज्ज्ञांकडून अद्याप कुठलेच धोरण ठरले नसल्याची चर्चा येथील डॉक्टरांमध्ये आहे.

नवीन संशयित रुग्णांमध्ये उमरेड येथील आठ तर नागपुरातील चार रुग्णांचा समावेश आहे. उमरेडच्या रुग्णांना तेथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले असून नागपूरच्या रुग्णांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचा येथील अधिकाऱ्यांचा दावा आहे.  या रुग्णांचे अहवाल काय येणार, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.  अहवाल  लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी सोमवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, या नवीन प्रकारच्या विषाणूच्या रुग्णांना हाताळणीचा अनुभव नसल्याने त्यांना तातडीने मेडिकल, मेयो रुग्णालयात ठेवायचे कुठे, त्यांच्यावर उपचाराची पद्धत कशी असावी, यावर गांभीर्याने मंथन करून प्रशासनाने एक मार्गदर्शक सूचना तयार करण्याची गरज आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णालयांत अद्यापही या विषयाला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याची चर्चा खुद्द तेथील डॉक्टरांमध्ये आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपुरात थैमान घातले होते. या लाटेत मोठय़ा संख्येने मृत्यूही नोंदवले गेले. या लाटेत येथे पाच ते सहा प्रकारचे करोनाचे नवीन प्रकार नोंदवले गेले होते. त्यामुळे हे रुग्ण आढळण्यापूर्वी  या रुग्णांना हाताळणीबाबत नियम निश्चितीची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

या विषयावर मेडिकल, मेयोतील डॉक्टरांनी नाव न टाकण्याच्या अटीवर हा करोनाचा नवीन प्रकार असला तरी त्याच्या उपचाराची पद्धत एकच असल्याचे सांगितले. या प्रकाराला खूप घाबरण्याची गरज नसून त्यावर करोनाच्या वार्डातही उपचार शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु येथून या उपप्रकाराचा प्रसार झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या विषयावर दोन्ही रुग्णालयातील अधिष्ठात्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.