राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत संख्या सर्वाधिक; वीज सुरक्षेबाबत तपासणी गरजेची
उपराजधानीसह विदर्भात उन्हाचा पारा चढताच कूलरचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. कूलर बसविताना विजेसंदर्भात विशेष काळजी घेण्याची गरज असताना अनेकाचे त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे विदर्भात प्रत्येक वर्षी सुमारे १५० हून जास्त व्यक्तींचा कूलरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू होतो. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू विदर्भात नोंदविले जातात. यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबईसह काही भागात दमट वातावरणामुळे कूलरचा वापर होतांना दिसत नाही. परंतु विदर्भ, मराठवाडय़ासह अनेक भागात आजही बहुतांश कुटुंबे कूलरचा वापर करताना दिसतात. कूलर बसविताना विजेच्या सुरक्षेसंदर्भात तपासणी करण्याची गरज आहे; परंतु त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील वर्षांच्या ४०० मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे १५० मृत्यू विदर्भात नोंदवण्यात येतात. या मृत्यूमध्ये कूलरमध्ये पाणी भरताना टिल्लू पंपाने होणाऱ्या मृत्यूंचाही समावेश आहे. सोबत कूलरमध्ये योग्य अर्थिग नसणे, विजेतील न्यूटल योग्य नसण्यासह विविध प्रकारच्या कारणांमुळे वीज अपघातासह वीज बिलही मोठय़ा प्रमाणात वाढते.
कूलरचे वीज बिल वाढण्याकरिता घरातील अर्थिग, न्यूटल योग्य नसणे ही प्रमुख कारणे बहुतांश ठिकाणी आढळतात. या कारणामुळे होणाऱ्या विजेच्या गळतीमुळे दररोज १० तास १२ इंची पंख्याचा कूलर चालल्यास महिन्याला ७५ युनिटऐवजी साधारणत: ११० युनिट वीज लागते. १८ इंची पंख्याच्या कूलरला इतकाच वेळ रोज चालविल्यास १२० युनिट ऐवजी १७५ युनिटहून जास्त वीज युनिट लागते. तेव्हा अप्रत्यक्षपणे वीज ग्राहकाला जादा वीज बिलाचा धक्का बसत असल्याचे दिसते. वीज बिल कमी यावे म्हणून कूलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू व १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिकल्स सर्किटचा वापर करणे फायद्याचे आहे.
अपघात टाळण्याकरिता घ्यायची काळजी
* कूलरच्या बाह्य़ भागात लोखंडाशी संपर्क येऊ नये याकरिता तो जमिनीवर ठेवा
* पाणी भरण्यापूर्वी वीजप्रवाह बंद करून प्लग काढा
* कूलरची वायर व घरातील अर्थिग तपासून घ्या
* कूलरचा वापर थ्री पिन प्लगवरच करा
* घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्या
* फायबर बाह्य़ भागात असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर करा टिल्लू पंपाबद्दल उपाय
* ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून टिल्लू पंप सुरू करू नका
* पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीजपुरवठा बंद करून त्याचा प्लग काढल्यानंतरच हात लावा
* पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडालेली नसावी
* पंपाचे अर्थिग योग्य असल्याचे तपासून घ्या
* पंपातून पाईपलाईनमध्ये वीज प्रवाह प्रवाहित होणार नाही याची काळजी घ्या