अकोला : भारतीय जनता पक्षातील चार पिढ्यांच्या संषर्घामुळेच पक्षाला आता चांगले दिवस आले आहेत. २०२४ ची निवडणूक तर जिंकूच. मात्र, भाजपचे पुढील २५ वर्षांतील निवडणुकांमधील विजयाचे लक्ष्य आहे, अशी महत्त्वाकांक्षा केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज येथे व्यक्त केली.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते अकोल्यात बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. अमित शाह यांनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र दिला.
हेही वाचा – स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान, “आमचा एक साधा कार्यकर्ताही…”
पुढे ते म्हणाले, ‘‘कार्यकर्ता भाजपची संपत्ती असून कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे नवी ऊर्जा प्राप्त होते. पक्ष विस्तारासोबत देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाईक म्हणून कार्यरत आहे. भाजप सकारात्मकपणे निवडणूक लढते. पक्षाला जनतेला अभिप्रेत नेता प्राप्त झाला. प्रत्येक वार्डात व सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपचा कार्यकर्ता हा विजयाचा मंत्र आहे. भाजप २०२४ ची निवडणूक जिंकणार आहेच. मात्र, पक्षाने पुढील २५ वर्षांतील सर्व निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. पक्षातील चार पिढ्यांनी संघर्ष, तपस्या, कष्ट व बलिदानातून पक्ष विस्ताराचे कार्य केले. त्यामुळे पक्षाला चांगले दिवस आलेत. येणाऱ्या पिढीला अजून चांगले काम करता येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्य सुरू आहे.’’
पुढील ४० दिवसांत पक्षाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडा. लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम करा. काँग्रेसने देशात केवळ राजकारण करून नुकसान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन समाजकारण, राजकारण व समाजातील प्रत्येक घटकासाठी विकासाचे कार्य सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्व घटकांना देण्याचे काम केले. जाती, धर्मात कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. आता कल्पकतेने जनतेशी संवाद साधा, अशी सूचना त्यांनी केली. राष्ट्र निर्माण व पक्ष विस्तारासाठी आपल्या क्षेत्रातील मतदान वाढवा व भाजप-महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपण स्वत: आहोत, असे समजून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – वर्धा : डॉक्टरची पदवी देतो म्हणून टाकला फास, केले साडेतेरा लाख रुपये लंपास…
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या राज्यातील कामगिरीची माहिती देऊन संघटनात्मक आढावा मांडला. यावेळी बुलढाणा जिल्हा लोकसभेचा आढावा डॉ. संजय कुटे, अकोला जिल्हा लोकसभेचा अहवाल भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, चंद्रपूर चंद्रकांत दुबे, अमरावती डॉ. अनिल बोंडे तर वर्धा लोकसभेचा अहवाल सुनील बट यांनी सादर केला. बैठकीचे सूत्रसंचालन रणधीर सावरकर, आभार प्रदर्शन अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांनी केले.
‘नव्यांमुळे जुन्यांचे नुकसान नाही’
पक्षात नव्याने येणाऱ्यांमुळे पक्षातील जुन्या निष्ठावानांचे कुठलेही नुकसान होणार नसल्याची भूमिका अमित शहा यांनी मांडली. आज पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढत आहे. सातत्याने काम करणाऱ्या व पक्ष विस्तार करणाऱ्यांची गरज असते. विचारांच्या लढाईसाठी सर्व समाजातील लोकांना पक्षाशी जोडावे. नवीन आलेल्यांमुळे जुन्यांचे नुकसान होणार नसून कोणताही पक्ष देत नाही, तर घेत असतो, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील सर्व जागा जिंकू – फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करून विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत व्यक्त केला. विकास कामे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा सातत्याने पक्ष विस्तारासाठी कार्यरत असतात. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर, ३७० कलम रद्द, तीन तलाक आदींसह सर्वसामान्यांची इच्छापूर्ती झाली. आता कार्यकर्त्यांनी महायुती धर्माचे पालन करावे. एकदिलाने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घ्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.