अमरावती: केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. ही योजना देशातील सर्वात मोठ्या शेतकरी कल्याणकारी योजनांपैकी एक असून, याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यांत प्रत्येकी २ हजार रुपये, असे एकूण ६ हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र, या वेळी काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे काही शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.
२१ व्या हप्त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता आवश्यक?
या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या अटी घालून दिल्या आहेत. त्यांची पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे रोखले जाऊ शकतात.
– ई-केवायसीची अट: पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
– जमिनीची पडताळणी: अर्जासोबत सादर केलेल्या जमिनीची माहिती महसूल विभागाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. जर जमिनीची पडताळणी अपूर्ण असेल, तर २१ वा हप्ता थांबवला जाईल.
– आधार-बँक लिंकिंग: या योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.
– चुकीची माहिती: काही शेतकऱ्यांनी अर्ज करताना जमीनधारणा, आधार क्रमांक किंवा बँक खात्याबाबत चुकीची माहिती दिल्याचे आढळले आहे. अशा शेतकऱ्यांना तपासणी पूर्ण होईपर्यंत पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांनी तातडीने काय करावे?
शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीशिवाय २१ वा हप्ता मिळवण्यासाठी खालील गोष्टी तातडीने कराव्यात:
– ई-केवायसी: जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपले ई-केवायसी त्वरित पूर्ण करावे.
– जमिनीची नोंद: आपल्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर योग्यरीत्या झाली आहे का, याची खात्री करावी.
– बँक लिंकिंग: बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का, हे तपासावे.
– माहितीची सत्यता: अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असल्याची पुन्हा एकदा खात्री करावी.
या सर्व अटींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याचा लाभ विनाअडचण मिळेल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.