नागपूर : केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज सोमवारपासून दोन दिवसीय संप पुरकारला असून आज पहिल्या दिवशी बँकिंग व्यवहार ठप्प झाले, परिणामी विदर्भातील बँकामधील सुमारे २५०० कोटी रुपयांचे व्यवहार आज होऊ शकले नाहीत, असा दावा संपकर्त्या संघटनांनी केला.
एआईबीईए, एआईबीओए आणि बीईएफआय या प्रमुख संघटनांच्या नेतृत्वाखाली ह दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. या संपात भारतीय स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सहभागी झाल्या नाहीत. मात्र इतर सर्व बँकांतील कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला. या संपाच्या निमित्ताने आऊटसोर्सिंग, कंत्राटी पद्धतीला विरोध तसेच नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले. संपात इस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोभाटे यांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, साधारण विमामधील कर्मचारी संघटनांनीदेखील संपात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी संपाला विरोध करणाऱ्या भारतीय मजदूर संघप्रणित कामगार संघटनांवर टीका केली. या संपामुळे विदर्भातील विविध बँकांमधील सुमारे २५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. उद्या यापेक्षा अधिक परिणाम होईल, असा दावाही कामगार संघटनांनी केला आहे.
१३ हजार कर्मचारी संपावर
पहिल्या दिवशी विदर्भातील विविध बँकांच्या ३५० शाखांमधील १३ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. किंग्जवे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर अनेक कर्मचारी संघटना संविधान चौकात गोळा झाल्या. यामध्ये बँक कर्मचारी संघटनांसह आयटक, सिटू यांचादेखील समावेश होता, असे इस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव स्वयंप्रकाश तिवारी यांनी सांगितले.
एप्रिलचे तीन दिवस सुटीचे
बँक कर्मचाऱ्यांचा संप २८ आणि २९ मार्चला आहे. ३० व ३१ मार्चला बँक सुरू राहील. १ एप्रिलला बँकेला सुटी असते आणि २ एप्रिलला शनिवार आणि ३ एप्रिलला रविवार आहे. त्यामुळे ३० आणि ३१ मार्च या दोन दिवसात बँक व्यवहार करण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
आयुर्विमा कर्मचाऱ्यांचा संप
भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. त्यामुळे सेवा कामकाज ठप्प झाले. संप यशस्वी झाल्याचा दावा अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी द्वारसभेत केला.
