२४ तासांत जिल्ह्य़ात ७ मृत्यू; ३५३ नवीन रुग्ण
नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७ करोनाबाधितांचा मृत्यू तर ३५३ नवीन बाधितांची भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी शहरात करोनाने केवळ एकच मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला.
नवीन मृत्यूमध्ये शहरातील १, ग्रामीणचे २, जिल्हय़ाबाहेरील ४ अशा एकूण सात रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरात २ हजार ६१८, ग्रामीण ६७८, जिल्हय़ाबाहेरील ५८२ असे एकूण ३ हजार ८७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात दिवसभरात २२३, ग्रामीण १२६, जिल्हय़ाबाहेरील ४ असे एकूण ३५३ नवीन बाधित आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या आता ९६ हजार ३१, ग्रामीण २४ हजार ५५१, जिल्हय़ाबाहेरील ७६४ अशी एकूण १ लाख २१ हजार ३४६ वर पोहचली आहे.
शहरातील करोनामुक्तांची संख्या ९० हजार पार
शहरात दिवसभरात ३२२, ग्रामीणला १४ असे एकूण ३३६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ९० हजार २११, ग्रामीण २३ हजार ९६ वर पोहचली आहे. गुरूवारी शहरात ३ हजार २०२, ग्रामीणला ९५६ असे एकूण ४ हजार १६१ स्सक्रिय रुग्ण होते.
आयुक्तांनी विमानतळावर आढावा घेतला
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी विमानतळावर व्यवस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गेल्या काही दिवसात जे प्रवासी बाधित आढळले आहेत अशांच्या संपर्कात आलेल्यांचा महापालिकेकडून शोध घेतला जात आहे. त्या अनुषंगाने विमानतळावर तपासणीची व्यवस्था, सामाजिक अंतरचे पालन कशाप्रकारे करण्यात येते याबाबत आयुक्तांनी आढावा घेतला. प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. ज्यांना हॉटेलमध्ये राहायचे नाही अशांसाठी व्हीएनआयटी येथे व्यवस्था आहे. या दोन्ही व्यवस्थेचा आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. संबंधित हॉटेलमध्ये डॉक्टरांची व्यवस्था व विलगीकरणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरून दोन बसेसची व्यवस्थाही महापालिकेने केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात बाहेरुन येणाऱ्या बाधित प्रवाशांची व करोनाची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा महापालिकेककडून शोध घेतला जात आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, त संजय निपाणे, पब्लिक हेल्थ इंस्टिटय़ूचे डॉ. संजय चिलकर, मिहान विमानतळाचे संचालक आबीद रुही, टर्मिनल मॅनेजर अमित कासटवार उपस्थित होते.
इंग्लंडहून परतलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर
इंग्लंडहून परतलेल्या नंदनवन येथील २८ वर्षीय तरुणाची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी त्याला ताप, इतर सौम्य लक्षणे होती. परंतु गुरूवारी त्यात बरीच सुधारणा झाली. या रुग्णा नमुने गुरूवारी पुण्याला पाठवण्यात आले. या रुग्णाला नवीन विषाणूमुळे बाधा झाली की जुन्या, हे पुण्यातील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. हा अहवाल येईस्तोवर वा रुग्ण करोनामुक्त होईपर्यंत त्याला मेडिकलमधून सुट्टी दिली जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
चाचण्यांची संख्या पुन्हा घसरली
शहरात दिवसभऱ्यात ३ हजार २१३, ग्रामीण ८८० अशा एकूण केवळ ४ हजार ९३ चाचण्या झाल्या. गुरुवारी जिल्ह्य़ात ९५० रुग्ण विविध रुग्णालयांत तर २ हजार ८५८ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू होते.