नागपूर जिल्ह्य़ातील स्थिती

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात असून यात महिलांचा पुरुषांच्या तुलनेत घटलेला टक्का हा सुद्धा प्रमुख मुद्दा आहे. जिल्ह्य़ातील १२ मतदारसंघात ५९ टक्के पुरुषांनी तर ५४ टक्के महिलांनी मतदान केले.

मतदानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाकडूनही प्रयत्न नेहमीच केले जातात. विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन महिलांनी मतदान करावे म्हणून आवाहन करीत असतात. मतदानाच्या दिवशी तर त्यासाठी साधनही उपलब्ध करून दिली जातात. मात्र त्यानंतरही पुरुष आणि महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत सारखेपणा नसतो. या निवडणुकीतही ती प्रकर्षांने जाणवली.

जिल्ह्य़ात एकूण २१ लाख ३४ हजार ९२१ पुरुष मतदार तर २० लाख ३६ हजार ३९९ महिला मतदार आहेत. यापैकी १२ लाख, ६९ हजार पुरुष मतदारांनी (५९.४७)तर ११ लाख १५ हजार, ७५८ (५४.७९)महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. महिलांचे सर्वाधिक मतदान काटोल मतदारसंघात (६७.५५ टक्के) झाले, तर सर्वात कमी मतदान मध्य नागपूरमध्ये (४६.३९ टक्के) झाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात १ लाख ९१ हजार ८०८ महिला मतदारांपैकी ९२ हजार ७०२ महिला मतदारांनी (४८.१३ टक्के) मतदान केले. द.पश्चिमच्या तुलनेत पूर्व नागपूरमध्ये (५० टक्के) महिलांनी अधिक मतदान केले. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक मतदान झाल्याने महिलांचेही प्रमाण अधिक आहे. या भागात महिला मोठय़ा प्रमाणात शेतात कामासाठी जातात. त्यानंतरही मतदानाचे प्रमाण शहराच्या तुलनेत अधिक आहे, हे उल्लेखनीय.

मतदारसंघ   टक्केवारी

द-पश्चिम              ४८.३३

दक्षिण                   ४७.९८

पूर्व                        ५०.५८

मध्य                     ४६.३९

पश्चिम                  ४६.९३

उत्तर                     ४८.३०

काटोल                   ६७.५५

सावनेर                   ६५.५२

हिंगणा                   ५८.६४

उमरेड                    ६७.०९

कामठी                   ५६.४१

रामटेक                   ६४.०३