नागपूर : येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईकाला चक्क ५८ दिवस फरफट करावी लागली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गोंधळात हा प्रकार घडला. अधिष्ठात्यांच्या निदर्शनात हा प्रकार आल्यावर त्यांनी दखल घेताच हे प्रमाणपत्र नातेवाईकांना मिळाले.

मेडिकलमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा ३० डिसेंबरला मृत्यू झाला. मृत्यूनंतर आवश्यक प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईक घेऊन गेले. अंत्यसंस्कारानंतर आवश्यक विधी करून सुमारे २० दिवसानंतर नातेवाईक मेडिकलला मृत्यू प्रमाणपत्रासाठी गेले. येथे मृत्यूची नोंदणी करणाऱ्या संगणकाचा ‘सर्व्हर डाऊन’ असल्याचे सांगत सलग दोन दिवस त्यांना परत पाठवले गेले. त्यानंतर संबंधित वार्डातून डॉक्टरांनी नोंदीचा अहवाल पाठवला नसल्याचे सांगत वार्डात पाठवले गेले.

हेही वाचा – अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले? मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…

वार्डात मृत्यूच्या दिवशी सेवेवरील डॉक्टर नसल्याचे सांगत उद्या या, परवा या करत परत पाठवले गेले. एके दिवस वार्डात चक्क डॉक्टरांचा वाढदिवस असल्याचे सांगत परत पाठवले गेले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकाने थेट अधिष्ठाता कार्यालय गाठत डॉ. राज गजभिये व तेथील एका दुसऱ्या अधिकाऱ्याला माहिती दिली. त्यानंतर एका या नोंदीशी संबंधित कर्मचाऱ्याकडे पाठवले गेले. येथे कर्मचाऱ्याने पून्हा वार्डात नोंदीचा एक फाॅर्म भरून आणायला सांगितले. त्यानंतरही डॉक्टर- कर्मचाऱ्यांच्या गोंधळात नातेवाईक सातत्याने भिवापूरहून येऊन फरफट करत होते. एकदा नातेवाईकांना १२ फेब्रुवारीला मृत्यू प्रमाणपत्राचे शुल्कही भरायला सांगण्यात आले. त्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नव्हते. शेवटी त्रास असह्य झाल्यावर सोमवारी त्याने अधिष्ठाता कार्यालय गाठले. येथे अधिष्ठात्यांना आपबिती सांगितली. अधिष्ठात्यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासात त्यांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले. या विषयावर एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर १२ फेब्रुवारीला अर्ज आल्यावर २६ फेब्रुवारीला मृत्यू प्रमाणपत्र नातेवाईकाला दिल्याची माहिती दिली. पुढे कुणालाही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

हेही वाचा – मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

मेडिकल रुग्णालयातील मृत्यू

मेडिकलमध्ये १ जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ४२ हजार ८५६ गंभीर रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ३ हजार ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील मृत्यूचे प्रमाण ८.२० टक्के आहे. मेयोत या काळात २५ हजार ५३७ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १ हजार ३३५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे प्रमाण ५.२२ टक्के आहे. मेडिकलमध्ये रुग्णशय्येची संख्या जास्त असल्याने आणि येथे गंभीर रुग्णच उपचाराला येत असल्याने मृत्यू जास्त आहेत.