नागपूर: मानवी आरोग्याला धोका पोहोचत असल्याच्या कारणावरून मुंबईतील कबुतर खान्यावर बंदी आणली गेली. हा वाद ताजा असतांनाच नागपुरातही काही भागात कबुतर पाळले जात असल्याचे वास्तव आहे. कबुतरमुळे ६० प्रकारचे आजार होत असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणने आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

कबुतरांच्या विष्ठेमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे आणि पिसांमुळे अनेक जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात. अस्थमा (दमा) हा यातील एक श्वसनाशी संबंधित प्रमुख आजार आहे. याशिवाय, फुप्फुसाचे आजार, न्यूमोनिया आणि इतर श्वसनविकार यांचाही यात समावेश आहे. मुंबईच नव्हे तर नागपूरसह इतरही शहरांमध्ये वाढलेल्या कबुतरांच्या संख्येमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याचा धोका आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे हवा प्रदूषित होते आणि त्यातून गंभीर आजार पसरतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक असतो.

गेल्या काही वर्षापासून नागपुरातही कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरात काही ठिकाणी कबूतर पाळले जातात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाणे टाकले जात असल्याने त्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींच्या बाल्कनी आणि टेरेसवर कबुतरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागपुरातही कबुतरापासून होणाऱ्या आजारांकडे नागरिकांनी लक्ष देण्याची गरज असल्येच मत ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले आहे.

छत, बाल्कनींवर कबुतरांचा उच्छाद

शहरातील बहुसंख्य उंच इमारतींमध्ये अनेक ठिकाणी बाल्कनी, टेरेसवरच नाही तर मेट्रो स्टेशन व उड्डाणपुलाच्च्या जागी कबुतरांचा उच्छाद वाढल्याचे दिसते. यामुळे सर्वत्र त्यांची विष्ठा पसरते, जी आरोग्यासाठी हानिकारक आहे. या भागातील नागरिकांना श्वास घ्यायला अडचण येणे किंवा धाप लागणे, सतत कोरडी खोकला, छातीत जडपणा किंवा दुखणे, थकवा, ताप, स्नायूंमध्ये वेदना, वजनात अचानक घट झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात ?

कबुतरांच्या संपकार्मुळे होणारा ‘हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस’ हा एक फुप्फुसांचा गंभीर आजार आहे, ज्यास ‘बर्ड ब्रिडर्स लंग’ किंवा ‘बर्ड फॅन्सिअर्स लंग’ असेही म्हणतात. हा आजार कबुतरांची विष्ठा, पिसे किंवा धुळीचे कण वारंवार श्वासातून शरीरात गेल्याने होतो. फुप्फुसांच्या एल्व्हिओली या भागात सूज येते आणि इम्यून रिअॅक्शन होते. वेळेवर निदान न झाल्यास फुप्फुसांच्या पेशींमध्ये कायमची जखम किंवा फिब्रोसिस होऊ शकते, असे मत ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.