देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : ‘बार्टी’ आणि ‘सारथी’च्या धर्तीवर सुरू झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’मध्ये सर्वाधिक लाभार्थी प्रवर्गाची संख्या आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे अद्यापही बँक, एलआयसी, पोलीस भरती प्रशिक्षण आदी कार्यक्रम सुरू झालेले नसल्याने संस्था स्थापन करण्याचा उद्देश काय? असा सवाल इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. शिवाय अन्य योजनाही थंडबस्त्यात असल्याने ‘महाज्योती’चा ८० टक्के निधी अखर्चित असल्याची बाब समोर आली आहे.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

‘महाज्योती’च्या स्थापनेमुळे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांना कधी नव्हे ते आपल्या उज्ज्वल भविष्याविषयी आशेचा किरण दिसू लागला. मात्र, ज्या संस्थांच्या धर्तीवर ‘महाज्योती’ची स्थापना झाली तो उद्देश थंडबस्त्यात आहे. संस्थेमध्ये सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पीएच.डी. प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, करोना संपला असतानाही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. इतर मागासवर्गातील बहुतांश विद्यार्थी हे बँक, पोलीस भरती, एलआयसी परीक्षांना सामोरे जातात. मात्र, दर्जेदार प्रशिक्षणाअभावी आवश्यक तसे यश मिळवता येत नाही. ज्या बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ची स्थापना झाली त्या संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि मराठा समाजासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण सुरू आहे. बार्टीचे बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरतीचे राज्यात ३० केंद्र सुरू आहेत. मात्र, ‘महाज्योती’मधील योजनांचा लाभ घेणाऱ्या इतर मागासवर्ग व अन्य प्रवर्गाची सर्वाधिक संख्या असतानाही अद्याप हे प्रशिक्षण सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती आदींच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी संचालक मंडळ सकारात्मक असतानाही केवळ काही अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे ही योजना अंमलात आली नसल्याची माहिती आहे.

२५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाज्योतीला २०२१-२२ या वर्षांकरिता १५० कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आणखी १०० कोटींची वाढ केली. अशाप्रकारे २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २५० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. त्यामुळे निधीची अडचण नसतानाही योजना बंद पडल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व योजना सुरू न झाल्याने संस्थेचा ८० टक्के निधी अखर्चित आहे.

बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती परीक्षांना ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थी सामोरे जातात. त्यामुळे त्यांना या परीक्षांचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.

उमेर्श कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंट राईट्स ऑफ असोशिएशन 

बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा ‘महाज्योती’चा मानस असून पुढे होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे.

प्रदीपकुमार डांगे, व्यवस्थापकीय संचालक