गुमगाव: भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले तर त्यांची १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना वर्धा मार्गावर जामठा शिवारात बेलेजा सर्व्हिस सेन्टर समोर शनिवारी सकाळी १० वाजता घडली. दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) आणि पत्नी सारिका दिलीप लेंडे (वय ४०, रा. संताजीनगर, बुटीबोरी) असे मृत दाम्पत्याचे नाव असून लावण्या लेंडे (१३) असे जखमी मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप लेंडे यांची मुलगी लावण्या आजारी असल्यामुळे तिला दवाखान्यात नेत होते. दुचाकीवर पत्नी सारिका व लावण्या बसलेल्या होत्या. जामठ्याजवळून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकी जवळपास ५०० ते ७०० मीटरपर्यंत फरफटत गेली. दिलीप आणि सारिका हे ट्रकमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आजारी मुलगी लावण्या ही रस्त्यावर फेकल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

हेही वाचा… ‘ॲप’द्वारे आहाराची निवड; असा घेणार जीवनशैलीचा मागोवा…

रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. नागरिकांच्या मदतीने जखमी मुलीला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. खूप उशिरा पोहचलेल्या हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. मात्र, चालक घटनास्थळावरून फरार झाला. मृतक दिलीप यांचा मुलगा अमृत लेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगणा पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरु केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात झाल्यानंतर नागरिकांनी आणि बघ्यांनी अपघातस्थळावर प्रचंड गर्दी केली. अनेक चालक रस्त्यावरच वाहन थांबवून अपघात बघत होते. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाण हिंगणा पोलीस उशिरा पोहचले. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी पोलीस वाहतूक कोंडी फोडण्यावर भर देत होते, अशी माहिती एका नागरिकाने दिली.