नागपूर: नवे पोलीस आयुक्त रुजू झाल्यापासून हत्याकांडाची मालिका आणि गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध रंगली आहेत. अनेक लहान गुन्हेगार वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांचा वचक संपल्यागत दिसत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला गुंडांनी दुचाकीवरूनच मारहाण केली व त्यात ती बेशुद्धच झाली. भर वस्तीत हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे.

गट्टू उर्फ हिमांशू नांदगावे (२७, म्हाडा क्वॉर्टर्स, नारी), सोनू भालादारे (२८, पंजाबी लाईन, इंदोरा) व त्यांच्या एका साथीदाराने हा प्रकार केला आहे. हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. इंदोरा परिसरात एक गरीब कुटुंब राहते. त्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी रात्री घराबाहेर उभी होती. वस्तीत कुणाचा तरी वाद सुरू असल्याने नेमका काय प्रकार आहे हे ती पाहत होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून मागून आले व मुलीच्या मानेवर जोरदार प्रहार केला.

हेही वाचा >>>संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण

त्यात ती जागेवरच बेशुद्ध पडली. एका अल्पवयीन मुलालादेखील या गुंडांचा मार बसला. मुलाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी बेशुद्ध पडल्याने नागरिकांनी धाव घेतली. आरडाओरड ऐकून तिचे कुटुंबीय धावत बाहेर आले. शुद्धीवर आल्यावर मुलीने हा घडलेला प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.