scorecardresearch

‘या’ गावात आहे धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा; साकडं पूर्ण करण्यासाठी भक्त करतात ‘अग्निदिव्य’

देवाचं साकडं पूर्ण करण्यासाठी धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याचे ‘अग्निदिव्य’ भक्त मोठ्या श्रद्धेने करतात.

This village has a tradition of walking on burning coals
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अकोला : देवाचं साकडं पूर्ण करण्यासाठी धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याचे ‘अग्निदिव्य’ भक्त मोठ्या श्रद्धेने करतात. ही अनोखी परंपरा पातूर तालुक्यातील मळसूर गावात जोपासली जाते. अक्षरशः अंगावर शहारे आणणारी ही कृती शेकडो भक्त पूर्ण करतात. मळसूर गावात ‘देवाचं लग्न’ उत्सव असतो. या उत्सवात परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते.

मळसूर गावाचे ग्रामदैवत सुपिनाथ महाराज यांचे प्राचीन मंदिर आहे. माघ महिन्यात मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत ‘देवाचं लग्नं’ लावण्याची प्रथा आहे. हे लग्न झाल्यानंतर साकडं फेडण्यासाठी लाकड्याच्या कोळशाच्या निखाऱ्यांवरून भाविक अनवाणी पायाने चालत जातात.

हेही वाचा >>> “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस…”, दोन आठवड्यांत मागितले उत्तर

ग्रामस्थ एका मोठ्या खड्ड्यात लाकडे जाळून तयार झालेल्या निखाऱ्यांची गावकऱ्यांकडून विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर मग धगधगत्या निखाऱ्यांवरून चालत भाविक मार्गक्रमण करतात. या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर ही भाविकांना कोणतीही इजा होत नाही, असा भाविकांचा समज आहे. पती-पत्नीने जोडीने सुपिनाथांकडे साकडं घातल्यानंतर मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीने साकडं फेडण्यासाठी लखलखत्या निखाऱ्यावर चालतात. अनेक शतकांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.

चमत्कार नाही

धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसून निखाऱ्याला हात लावल्यास दोन सेकंदापेक्षा जास्त स्पर्श टिकून राहिला तरच त्याचा चटका जाणवतो, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद वानखेडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:03 IST
ताज्या बातम्या