डॉ. अभय बंग यांचा परखड सवाल; माध्यम र्निबधांवरून सरकारवर ताशेरे

तुम्हाला विकास पाहिजे की वैचारिक स्वातंत्र्य असा पर्याय या देशातील सरकारांनी सध्या दिला आहे. सामान्य लोक विकासाच्या कल्पनेच्या मागे धावत असल्यामुळे विचार स्वातंत्र्याची गळचेपी सुरू झाली आहे याचे एनडीटीव्हीवरील कारवाई हे उत्तम उदाहरण असून प्रसार माध्यम स्वतंत्र हवे की नको, असा परखड सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला.

जनमंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित एका सोहळ्यात अमीर हबीब यांना जनगौरव पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर, डॉ. अभिमन्यू निसवाडे, अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण किंवा रामदेबाबा यांचे कार्यक्रम सुरू असतील तर सर्वच वाहिन्यांवर तेच दाखवले जातात. सर्वच वाहिन्यांवर एकसारखे प्रसारण असते. प्रसार माध्यमे केवळ नावापुरतीच स्वतंत्र आहेत. आपले राजकीय नेते विकासाचा दर ७.१ टक्के असे अभिमानाने सांगत आहेत. हे सत्य असेल तर आनंदाची बाब आहे. परंतु तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य हवे की विकास हवा आहे. परंतु विकासाकरिता वैचारिक स्वातंत्र्याचा बळी देणे आवश्यक आहे काय, या दोन्ही गोष्टी साधल्या जाऊ शकत नाही काय, हा कळीचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

एनडीटीव्हीचे मालक प्रणय रॉय यांच्या निवासस्थानी सीबीआय छापे टाकले. त्यानंतर झालेल्या एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करीत बंग म्हणाले, प्रसार माध्यमांनी आपण किती वेढलो गेले आहोतआणि किती भ्रष्ट आहेत, याचे  विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आले आहे. आपल्याला प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य हवे की नाही, असा सवाल त्यांनी केला.