अमरावती : खुल्या भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा भूखंडाच्या अस्वच्छतेमुळे शहरात दुर्गंधी आणि डेंग्यू, मलेरिया यांसारखे विविध आजार पसरले आहेत. खुल्‍या भूखंडाची स्‍वच्‍छता स्‍वत:हून करवून घ्‍यावी, अन्‍यथा महापालिका साफसफाई करेल, मात्र त्‍यासाठी येणारा खर्च दंड म्हणून वसूल करण्‍यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता.

अशा ४०० हून अधिक भूखंडधारकांना नोटीसदेखील बजावण्‍यात आल्‍या होत्‍या. नोटीसला न जुमानता त्‍याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन भूखंडधारकांविरुद्ध महापालिकेने राजापेठ पोलीस ठाण्‍यात फोजदारी तक्रार नोंदविली आहे.

हेही वाचा – सायबर गुन्हेगाराकडून काँग्रेस नेत्याची फसवणूक; पोलिस निरीक्षकाच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते

शहरात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. या भूखंडांवर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा आणून टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. कीटकजन्य, जलजन्य व साथीच्या आजाराचे उगमस्थान तयार होते. याकरिता शहरातील खुल्या भूखंडांवर होत असलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराई तसेच इतर आजार व साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी, प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खुल्या भूखंडधारकावर कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

हेही वाचा – वर्धा : भाजपाच्या नगराध्यक्षांच्या कामाची बोंब अन् आता दुरुस्ती करणार भाजपाचेच आमदार!

यानुसार, कचरा असलेल्या भूखंड मालकीबाबत माहिती असल्यास संबंधितास नोटीस बजावून संबंधितांकडून सात दिवसांच्‍या आत साफसफाई करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्‍वच्‍छता विभागाकडून ४०० हून अधिक खुल्‍या भूखंडधारकांना नोटीस बजावण्‍यात आल्‍या आहेत. या मालिकेत राजापेठ परिसरातील दोन भूखंडधारकांना नोटीस बजावण्‍यात आल्‍या. त्‍यानंतरही संबंधितांच्‍या भूखंडावर कचरा, पाण्‍याचे डबके साचून असल्‍याने परिसरातील न‍ागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले. त्‍यामुळे संबंधितांविरुद्ध फौजदारी स्‍वरुपाची तक्रार दाखल करण्‍यात आली.