नागपूर : निर्बंध शिथिल झाल्याने यंदा दिवाळीत राज्यातील विविध भागात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे करोना रुग्ण वाढण्याचा अंदाज असताना उलट लक्ष्मीपूजनानंतरच्या नऊ दिवसांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या घटली. परंतु नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण किंचित वाढल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आले आहे.

शासनाने करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लावलेल्या कडक निर्बंधामुळे गेल्यावर्षी २०२० मध्ये नागरिकांना नेहमीप्रमाणे दिवाळीचा उत्सव साजरा करता आला नाही. परंतु यंदा दिवाळीपूर्वी राज्यातील करोनाची स्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे शासनाने काही निर्बंध शिथिल केले. त्यातच दिवाळीत यंदा मोठय़ा संख्येने नागरिक विविध वस्तूंच्या खरेदासाठी बाजारात निघाले. त्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी नोकरी व कामानिमित्त परगावी असलेले नागरिक  मूळ गावी आले. यावेळी मुखपट्टीसह शारीरिक अंतराच्या नियमांकडेही कानाडोळा केला गेला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण वाढण्याचा धोका वर्तवला जात होता.

परंतु उलट राज्यात ४ नोव्हेंबर २०२१ ते १३ नोव्हेंबर २०२१ या नऊ दिवसांच्या कालावधीत ८ हजार ४५ एवढेच सक्रिय करोनाग्रस्त आढळले. सोबत नऊ दिवसांत राज्यात २२० करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर राज्यात ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ६२ होती. ही संख्या १३ नोव्हेंबरला आणखी खाली येऊन १२ हजार २१९ रुग्ण एवढीच होती. १३ नोव्हेंबपर्यंत राज्यात ६६ लाख १५ हजार २९९ करोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यातील १ लाख ४० हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के आहे. तर ४ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान नऊ दिवसांत आढळलेले ८ हजार ४५ नवीन रुग्ण व २२० रुग्णांच्या मृत्यूची संख्या बघता मृत्यूचे प्रमाण २.७३ टक्के एवढे किंचित वाढलेले दिसत आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९७.६४ टक्के राज्यात ४ नोव्हेंबपर्यंत ६४ लाख ५६ हजार २६३ व्यक्ती करोनामुक्त होते. या तारखेपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.६० टक्के होते. १३ नोव्हेंबपर्यंत राज्यात ६४ लाख ५६ हजार २६३ व्यक्ती करोनामुक्त झाले. हे करोनामुक्तांचे प्रमाण आणखी सुधारून ९७.६४ टक्के एवढे होते.