एअरो मॉडेलिंगमधील कामगिरीचे उदयपूरच्या राजकुमाराकडून कौतुक

चिमुकल्यांचे आयुष्यही हल्ली चार भिंतीच्या आत बंदिस्त झाले आहे. मैदानावरचे खेळ म्हणजे काय हे कित्येकांना माहितच नाही. मात्र, शहरातील अवघ्या सातवीतल्या त्रयींनी मैदानातले नव्हे तर आकाशातल्या खेळांचे मैदान गाजवले. या खेळात भल्याभल्यांची भंबेरी उडते, पण ‘या’ त्रयींनी वयाने चार, पाच दशके मोठय़ा असलेल्या दिग्गजांना हरवत अवकाश भरारी घेतली. चिमुकल्यांच्या या अवकाश भरारीचे कौतुक करण्यावाचून उदयपूरच्या राजकुमारालासुद्धा राहावले नाही.

एअरो क्लब ऑफ इंडिया आणि एअरो मॉडेलर्स असोसिएशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी राष्ट्रीय एअरोमॉडेलिंग स्पर्धा उदयपूर येथे नुकतीच झाली. उदयपूरचे राजकुमार लक्षराजसिंग मेवाड यांच्या स्वत:च्या मालकीच्या खासगी शिकारवाडी रनवेवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. लक्षराजसिंग हे स्वत: एअरोमॉडेलर असून त्यांचे वडील वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्या खासगी मालकीच्या रनवेवर बरेचदा विमानांची प्रात्यक्षिके होत असतात. दुसऱ्या राष्ट्रीय एअरोमॉडेलिंग स्पध्रेचे वैशिष्टय़ म्हणजे ही स्पर्धा विविध वयोगटात नव्हती, तर पाचव्या वर्षांपासून तर ७० वष्रे अशा एकाच वयोगटात होती. अभिग्यान रुपेश पटेल, निहार राजकुमार रडके आणि निशाद नागेश गेडाम या तिन्ही चिमुकल्यांनी या स्पध्रेत भाग घेण्याचे धाडस केले. वास्तविक या तिघांनाही एअरोमॉडेलिंगच्या क्षेत्रात येऊन खूप काही काळ लोटला नव्हता. तरीही स्पध्रेत सहभागी होऊनच नव्हे तर, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची पारितोषिके घेऊन ती परतली. रिमोटच्या तालावर विमान उडवणे ही सोपी गोष्ट नाही. कारण आकाशातले विमान आणि हातातले रिमोट या दोन्हीवर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे कठीण आहे. या तिन्ही त्रयींनी अगदी सहजपणे ही कामगिरी पार पाडली.

‘स्पॉट लँडींग’ हा प्रकार म्हणजे ३५ सेकंदात आकाशात विमान उडवून आणि इंजिन बंद करून जमिनीवर दिलेल्या खुणेपर्यंत सुरक्षित उतरवणे आणि ‘ग्लायडिंग’ हा प्रकार म्हणजे विमान आकाशात उडाल्यानंतर इंजिन बंद करुन ३५ सेकंदपर्यंत ते स्थिर ठेवणे.

या दोन्ही प्रकारात अभिग्यान, निहार आणि निशादने आपले नाव कोरले आणि मोठमोठय़ा एअरोमॉडेलरला मागे टाकत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले. भारतातील प्रसिद्ध एअरोमॉडेलर राजेश जोशी यांच्याकडे ते एअरोमॉडेलिंगचे प्रशिक्षण घेत आहेत.

निहार आणि निशाद हे दोघेही के. जॉन पब्लिक स्कूलमधील सातव्या वर्गाचे विद्यार्थी आहेत. तर अभिग्यान हा पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील सातव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. निहार गेल्या चार महिन्यांपासून एअरो मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेत आहे तर अभिग्यान हा देखील वयाच्या सातव्या वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. विमान तयार करण्यापासून तर ते उडवण्यापर्यंतची कामगिरी हे त्रयी पार पाडत असल्याने त्यांचे प्रशिक्षक राजेश जोशी त्यांना ‘ज्युनिअर इन्स्ट्रक्टर’ म्हणून संबोधतात. या तिघांशीही संवाद साधला तेव्हा आकाशातल्या खेळांचे मैदान गाजवणारी हीच का ती मुले, असा प्रश्न पडल्यावाचून राहिला नाही.