वाघ आणि इतर वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्ये तयार केली जात असतील आणि त्यातून वाघच नाहीसे होत असतील तर? जळगाव जिल्ह्य़ातील यावल अभयारण्यात अशीच परिस्थिती उद्भवली आणि तब्बल दीड दशकानंतर या अभयारण्याने व्याघ्रदर्शन अनुभवले. या व्याघ्रदर्शनाने अभयारण्य प्रशासनाला सुखद धक्का दिला असून जबाबदारी वाढल्याचे मत यावल अभयारण्य प्रशासनाने व्यक्त केले.

अतिक्रमण, अवैध चराई आणि इतर कारणांमुळे यावल अभयारण्यातून गेल्या दीड ते दोन दशकांपासून वाघाचे अस्तित्त्वच नाहीसे झाले होते. त्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी या अभयारण्यात रानकुत्र्याने दर्शन दिल्यानंतर स्थानिक स्वयंसेवींनी या अभयारण्यातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसंदर्भात अभयारण्य प्रशासनावर दबाव आणला. परिणामी अभयारण्यातील वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचे व्यवस्थापन थोडे मजबूत झाले. गेल्या दोन-तीन वषार्ंपासून या अभयारण्यात वाघ असल्याची चर्चा होती. मात्र, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी थेट ही बाब नाकारली. दरम्यान, दोन वाघांच्या झुंजीची चर्चा याठिकाणी रंगली आणि पुन्हा एकदा स्वयंसेवींनी वनखात्यावर दबाव आणला. स्वयंसेवींच्या आग्रहामुळे या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले.

रविवारी, ३ जानेवारीची रात्र ते सोमवार ४ जानेवारी सकाळपर्यंत जामणी शिवारातील कॅमेऱ्यात गायीला मारून खाणारा वाघ कैद झाला. त्यामुळे वाघाचे अस्तित्त्व नाकारणाऱ्या यावल अभयारण्य प्रशासनाला ही बाब स्वीकारावी लागली.

अंबाबरवातील वाघ?

सह्य़ाद्री व सातपुडय़ाला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. तब्बल दीड दशकानंतरच्या वाघाच्या अस्तित्त्वाने या कॉरिडॉरची महत्ता सिद्ध केली आहे. सुरुवातीला हा वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील असावा, अशी दाट शंका व्यक्त केली जात होती. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातला हा वाघ नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. अंबाबरवा अभयारण्यातील हा वाघ असू शकतो, अशी शंका आता स्वयंसेवी व्यक्त करीत आहेत. यावलमध्ये आधी वाघाचे अस्तित्त्व होते, पण गेल्या १५-१६ वषार्ंपासून या परिसरातून वाघ नाहीसे झाले.