नागपूर : एअर इंडियाच्या अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स २८ तासांतच तपास पथकांना शोधून काढला आहे. त्याच्या तपासणीत अपघाताचे प्राथमिक कारण एक महिन्यात समजेल. मात्र अंतिम अहवाल येण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशा अहवालासाठी वर्षभर वाट पाहावी लागत होती. पूर्वी विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सचा तपास अमेरिका, फ्रान्स किंवा ब्रिटनच्या प्रयोगशाळांमध्ये होत होता, आता मात्र देशातच आधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली आहे.

देशातील एकमेव दिल्ली येथील विमान अपघात तपास संस्थेच्या (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो) ताब्यात हा ब्लॅक बॉक्स असून तेथे त्याची तपासणी होणार आहे. तज्ज्ञांच्या मते अपघाताचे नेमके कारण समजण्यास पूर्वीइतका उशीर होणार नाही. भारताने हवाई अपघाताच्या तपासात ऐतिहासिक पाऊल टाकत ब्लॅक बॉक्सचे एफडीआर व सीव्हीआर विश्लेषणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन केली. विमान अपघात तपास संस्थेमार्फत दिल्लीतील सफदरजंग विमानतळ परिसरात ही प्रयोगशाळा कार्यरत आहे. त्यामुळे आता देशातील विमान अपघातानंतर फ्लाइट डेटा आणि कॉकपिट संवादाचे विश्लेषण परदेशात पाठविण्याची आवश्यकता नाही.

ही संस्था ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील माहिती सखोल विश्लेषण करून अंतिम अहवाल देणार आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने संबंधित विमानाचा उड्डाणाचा वेग, उंची, इंजिन कार्य, स्वयंचलित प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींचा तपशील मिळणार आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून वैमानिक आणि सह वैमानिक यांच्यातील संभाषण, अलार्म्स आणि कॉकपिटमधील आवाजांचे विश्लेषण केले जाणार आहे.

‘एएआयबी’ काम काय?

एएआयबी या संस्थेकडे देशातील विमान अपघातांची चौकशीची जबाबदारी आहे. आयकाव (आयसीएओ) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही संस्था काम करते. निष्पक्ष, स्वतंत्र आणि वैज्ञानिक पद्धतीने कामकाज करते. अपघाताच्या ठिकाणचे फोटो, व्हिडिओ, साक्षीदारांची माहिती गोळा केली जातात.

संबंधित विमानाचे इंजिन, फ्लॅप्स, हायड्रॉलिक, इंधन व्यवस्था तपासली जातात. एटीसीचे रेकॉर्डिंग, पायलटचे ट्रेनिंग, मेटेनन्स रेकॉईसची तपासणी केली जाते. वैमानिक आणि कूच्या वैद्यकीय स्थितीची चौकशी करण्यात येते.

ब्लॅक बॉक्स नष्ट का होत नाही?

अपघात कितीही मोठा असला तरी, ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो.

ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण आहे, ज्याचे काम उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणे आहे. ही एक डिजिटल डायरी आहे, जी विमानात बसवली जाते आणि त्यात बरीच माहिती साठवली जाते आणि जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर, त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात, एकामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर असतो, जो विमानाच्या उड्डाणादरम्यान होणारी सर्व तांत्रिक माहिती जसे की वेग, उंची, दिशा, इंधन पातळी आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड सह इतर माहिती रेकॉर्ड करतो. या सोबतच तो पायलट आणि सह-पायलटमधील नाषण देखील रेकॉर्ड करतो.