घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण; सर्वत्र वायू प्रदूषण
दिल्लीतील प्रदूषणामुळे सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली असतानाच नागपूरलाही दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर फुटलेल्या फटाक्यांसह वाढलेल्या थंडीमुळे शहरात वायू प्रदूषण वाढले आहे. हवा दूषित झाल्याने शहरात विविध संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून प्रत्येक घरात लहानांपासून मोठय़ांपर्यंत एकतरी रुग्ण आढळत आहे. अचानक रुग्ण वाढल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा वाढल्या असून शहरातील काही भागात अस्वच्छतेमुळे होणारे आजारही बळावले आहेत.
दिवाळी हा आनंद, उत्साह देणारा सण असून तो सर्वत्र साजरा केला जातो. याही दिवाळीत नागपूरकरांनी दिवाळीत मिठाई व फराळाचे विविध खाद्यपदार्थ तयार करून ते वाटण्यासह इतरही अनेक उपक्रम राबवले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी कोटय़वधींच्या फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यात निळा, पिवळा, हिरवा, लाल, जांभळा रंग निघण्याकरिता अॅल्युमिनिअम, अॅन्टमनी सल्फाईड, बेरियम नायटेन्ट तसेच तांबे, शिसे, लिथियम, स्टनॅन्शियम, अर्सेनिक यासारख्या घटकाचा वापर केला जातो. फटाके उडवल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेक दुर्धर व्याधी मानवाला होऊ शकतात. गर्भात असलेली मुले व नवजात मुलांसह इतरांवरही त्याचा प्रभाव पडतो. हा त्रास टाळण्यासाठी यंदा काही पर्यावरणवाद्यांनी नागरिकांना फटाक्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते, परंतु नागरिकांकडून त्याला प्रतिसाद न देता मोठय़ा प्रमाणावर सगळ्याच भागात फटाक्यांची मोठय़ा प्रमाणावर आतषबाजी केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या धुरासह इतर वायूतील विषारी घटक हवेत खाली राहत असल्याने शहरात श्वसनासह विविध प्रकारचे आजार वाढले आहेत. शहरातील शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकल, मेयो, डागा, डॉ. आंबेडकर रुग्णालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांत रोज सुमारे हजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या रुग्णांची नोंद होत आहे.
सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, अस्थमा, तापासह श्वसनाशी संबंधित आहेत. खासगी रुग्णालयातही याहून जास्त रुग्णांवर रोज उपचार केला जात असले तरी त्याची कुठेही नोंद केली जात नाही. त्यातच शहराच्या काही भागात योग्य स्वच्छता होत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांत डासांचीही संख्या वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डास वाढल्याने संबंधित आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून सर्वत्र डेंग्यू, मलेरियासदृश्य आजाराचे रुग्ण वाढल्याचे खुद्द डॉक्टर सांगत आहेत. डासांवर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाची असून त्यांचे याकडे लक्षच नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता महापालिका काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शहराची हवा फटाक्यांमुळे दूषित होण्यासह अचानक थंडी वाढल्यामुळे नागपुरात सर्दी, खोकला, तापासह श्वसनाशी संबंधित रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांची संख्या त्यात सर्वाधिक असून हा आजार पसरू नये म्हणून प्रत्येकाने वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, खोकलताना तोंडावर स्वच्छ कापड ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घर वा कार्यालयातून बाहेर जाताना नाकावर मास्कसह स्वच्छ कापड ठेवण्याची गरज आहे. रुग्णांनी वेळीच तज्ज्ञ शासकीय व खासगी डॉक्टरांचा सल्लाही घेण्याची गरज आहे. – डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ, नागपूर