वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या २१ ऑगस्ट रोजी वर्धा दौऱ्यावर आहेत. अधिकृत शासकीय दौरा अद्याप आलेला नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणा सुरक्षा व अन्य बाबतीत तयारीस लागलेली आहे. प्रथम अजित पवार यांचे थेट आगमन हिंगणघाट येथे होणार होते. मात्र आता त्यात बदल झाला असून पवार हे सकाळी वर्धा गाठणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पवार यांची बैठक आहे. तसेच संवाद पण साधणार. उपमुख्यमंत्री येणार म्हणून प्रशासनाची धांधल उडल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. मात्र म्हणतात की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा निश्चित झाला आहे. उद्या ते सकाळी वर्ध्यात येणार. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार. ही बैठक पिक पाणी पुरतीच नसून विकास कामांचा आढावा ते घेण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकारी यांनी लोकसत्तास सांगितले.
राज्याच्या राजकारणात हिंगणघाट मतदारसंघ हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नजरेच्या टप्प्यात नेहमी राहला. अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा मतदारसंघ आघाडीत तेच मागून घ्यायचे. पण काका पुतणे फूट पडली आणि हा मतदारसंघ दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठा करणारा ठरला. गत विधानसभा निवडणुकीत हिंगणघाटचे शरद पवार म्हणून ओळख झालेले बाजार समिती अध्यक्ष सुधीर कोठारी यांनी नवख्यास तिकीट दिली व निष्ठावंत डावलले म्हणून नाराजी नोंदविली होती. तसेच माजी आमदार राजू तिमांडे यांना उमेदवार करीत विद्रोह केला. तेव्हा प्रचार करण्यास आलेल्या शरद पवार यांनी वेळ काढून कोठारी यांच्या निवासस्थानी भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा, पडत्या काळात आम्ही भिंती सुरक्षित ठेवल्या व आता केवळ रंगोटी करण्यास आलेल्यास उमेदवारी देता, साहेब हे कसे पचणार, असा सवाल करीत कोठारी यांनी बंडखोरी मागे घेण्यास पवार यांना विनम्र नकार दिला होता.
पुढे कोठारी व तिमांडे हे पक्षाशी नाते सोडते झाले. अजित पवार यांच्याशी संधान साधले. अजित पवार राष्ट्रवादीचे ते हिंगणघाटचे प्रमुख सुभेदार बनले. आता अजित पवार हे कोठारी यांच्या बाजार समितीच्या कार्यक्रमास येत आहेत. त्यासोबतच पक्षप्रवेश कार्यक्रम होत आहे. निखाडे मंगल कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे राजू तिमांडे यांनी सदर प्रतिनिधीस सांगितले.
तिमांडे म्हणाले की, हा पक्ष प्रवेश सोहळा शरद पवार गटास पुरता रिकामा करून जाणार. दोघेच उरतील. दोन्ही खरेदी विक्रीचे अध्यक्ष तसेच संचालक, समुद्रपूर नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच गटनेते आमच्या अजित पवार गटात येत आहे. बाजार समिती पदाधिकारी आहेच. माजी पदाधिकाऱ्यांची तर गणतीच नाही. आजच सांगतो शेकडो पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतील.