अकोला : राज्यात तरुणांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. असंख्य तरुण अविवाहित असून त्यांना जोडीदार मिळत नसल्याने सामाजिक अडचणी तयार होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गळ घातली. त्याने शरद पवारांना पत्र देऊन लग्न लावून देण्याची विनंती केली. आपले उपकार जन्मभर विसरणार नाही असे देखील त्याने पत्रात नमूद केले आहे. या अनोख्या मागणीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. तरुणांच्या लग्नाचे भीषण स्वरूप देखील समोर आले आहे.
अकोल्यात शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर त्यांनी शेतकरी, नागरिक व तरुणांकडून पत्र व निवेदने देखील स्वीकारली. यामध्ये शरद पवार यांना प्राप्त झालेल्या निवेदनात एका लग्नाळू तरुणाच्या अनोख्या मागणीने लक्ष वेधून घेतले आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे भीषण वास्तव दिसून येते. या समस्येने विदारक स्वरूप प्राप्त केले आहे. त्याचा प्रत्यय शरद पवार यांना लग्नाळू तरुणाने दिलेल्या पत्रावरून येतो. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींची संख्या वाढली. नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रमाण सुद्धा मोठे आहे. या मुलींना होणाऱ्या नवऱ्याविषयीच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलापेक्षा शहरी भागातील नोकरदार तरुणांना मुलींची पसंती आहे. ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणाने आता थेट शरद पवारांनाच लग्न लावून देण्याची गळ घातली.

पत्रात नेमकं काय?
या लग्नाळू तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही.” तरुणाचे हे पत्र आज समाज माध्यमावर प्रचंड प्रसारित झाले.
