अकोला : गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्याला बसला आहे. ३८९ घरांची पडझड झाली असून सुमारे ६० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. २६ जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. १० मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मंगळवारी पावसाने उसंत घेतली. १७ आणि १८ ऑगस्टला जिल्ह्यातील ५२ पैकी १० मंडळात अतिवृष्टी झाली. अकोला तालुक्यातील अकोला ६६.८८, घुसर ८२.८०, दहिहांडा ९९.८०, बोरगाव ८२.८०, पळसो ९८.५०, सांगळूद ८२.८०, कौलखेड ९०.८० मि.मी. मूर्तिजापूर तालुक्यातील निभा १२६.३०, माना ६७.३० आणि पातूर तालुक्यातील आलेगाव मंडळात ७४ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात १७ ऑगस्टला सरासरी ३८.६०, तर १८ ऑगस्टला ७.६० मि. मी. पाऊस पडला. या पावसामुळे अकोला तालुक्यात ४४, मूर्तिजापूर २३८, अकोट १२, तेल्हारा ९५ अशा एकूण ३८९ घरांची पडझड झाली आहे.
त्यामध्ये ३८१ घरांचे अंशत:, तर आठ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यात सहा आणि पातूर तालुक्यात २० अशा एकूण २६ जनावरांचा मृत्यू झाला. पावसामुळे आस्टूल, पास्टूल, झरंडी, अंधारसांगवी, पांढूर्णा, खामखेड, चोंढी, कोठारी बु. व अगिखेडे गावाचे मार्ग बंद झाले.
मुसळधार पावसाचा शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली. अकोला तालुक्यातील १०२ गावातील १६ हजार ५८० हेक्टर, मूर्तिजापूर तालुक्यातील १३३ गावातील ३७ हजार ०९९ हेक्टर, पातूरच्या ३७ गावातील एक हजार ६५५ हेक्टर, बार्शीटाकळीच्या तीन गावातील १५ हेक्टर, तेल्हारा तालुक्याच्या ४१ गावातील दोन हजार ५०० हेक्टर आणि अकोट तालुक्यातील ४० गावातील एक हजार ४४० हेक्टर अशा एकूण जिल्ह्यातील ३५६ गावातील ५९ हेक्टर २८९ शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तूर, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांना पावसाचा जबर फटका बसला. पातूर तालुक्यातील दोन हेक्टर जमीन खरडून गेली, अशी नोंद जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे १० द्वार ६० से.मी. ने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोर्णा आणि निर्गुणा प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू केला.