अकोला : राजकारणावर प्रचंड गाजलेल्या ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील दृश्याप्रमाणे एक-एक रुपयांची अनामत रक्कम आणून एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. वाशीम नगर पालिकेत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतांना उमेदवाराने पाच हजारांची अनामत रक्कम एक-एक रुपयांच्या नाण्यात जमा केली. ती रक्कम मोजतांना निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. आपल्या मुलीने जमा केलेली रक्कम आपण अनामत म्हणून भरल्याचे संबंधित उमेदवाराने सांगितले.

वाशीम नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वाशीम नगर पालिकेत दाखल एका अर्जाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण अनामत रक्कम म्हणून उमेदवाराने चक्क एक-एक रुपयांची चिल्लर नाणी आणली. काँग्रेसकडून तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या राजू वानखडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत अनामत रक्कम म्हणून त्यांनी तब्बल पाच हजारांची एक रुपयांची नाणे आणले. नगर पालिकेत अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल झाल्यावर कार्यालयात त्यांनी अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात सादर केली. उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून एक-एक रुपयांची चिल्लर नाणे आणल्याने ती मोजमाप करताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. अर्ज स्वीकृती प्रक्रियेमध्ये चिल्लर मोजतांना अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाल्याचे चित्र होते.

राजकारणावर भाष्य करणारा प्रसिद्धी मराठी चित्रपट ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ यामध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी साकारलेले उमेदवाराचे पात्र देखील निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणी अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन येतो, असे गंमतीशीर दृश्य दाखवण्यात आले आहे. वाशीम येथे त्याच चित्रपटातील दृश्याप्रमाणे उमेदवार चिल्लर घेऊन आल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘मुलीने मायेने एक-एक रुपया जमा करून दिली रक्कम’

मुलीने मायेने एक-एक रुपया जमा करून रक्कम दिली. अनामत रक्कम म्हणून ती भरावी असा तिचा आग्रह होता. त्यामुळे नाण्यांच्या स्वरूपात अनामत रक्कम जमा केली. अनामत रकमेसाठी चिल्लर आणू नये, असा कोणताही नियम नाही, असे उमेदवार राजू वानखडे यांनी सांगितले.