अकोला : जिल्ह्यात पीक विम्याचा प्रश्न पेटला असून यावर बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली. या गंभीर प्रश्नावरील बैठकीत काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडले. अधिकारी आल्याशिवाय कुणालाच बाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला होता.

अकोला जिल्ह्यात पीक विम्याच्या असंख्य तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली. विमा काढताना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक विम्याच्या गंभीर प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ला ‘कामबंद’चा फटका? संयुक्त पूर्व परीक्षा आता…

पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी गुरुवारी बाळापूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी महसूल, कृषी, आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आमदार नितीन देशमुख यांनी बोलावले होते. विमा विभागासह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नितीन देशमुख संतप्त झाले. अधिकारी का उपस्थित झाले नाहीत? असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढत नाहीत, तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, सर्व दरवाजे लावून घ्या, असे आमदार नितीन देशमुख यांनी बजावले. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळाले नाहीत. पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीला अधिकारी उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – गडचिरोली : चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांत ७ पुरुष ५ महिला, मृतांवर दोन राज्यांत २ कोटींहून अधिक बक्षीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीला बोलवूनदेखील उपस्थित न राहिलेले अधिकारी आणि विमा कंपन्यांचे पदाधिकारी जोपर्यंत हजर होत नाहीत, तोपर्यंत तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणार असल्याची भूमिका आमदार नितीन देशमुख यांनी घेतली. अखेर कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बाळापूर येथे दाखल झाले. त्यानंतर नितीन देशमुख यांनी पीक विम्याच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला.