अकोला : महानगरपालिकेने शहरातील मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून कर भरणा प्रणाली सुरू केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही ऑनलाइन प्रणाली बंद असल्याने महानगरपालिकेचे नुकसान होत आहे.

शिवाय मालमत्ताधारकांना कर भरण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणी दखल घेऊन ऑनलाइन मालमत्ता करप्रणाली पूर्ववत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनद्वारे केली आहे.

हेही वाचा – यवतमाळ : नगर परिषदेतील घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकाराची चौकशी, आयुक्तांनी नियुक्त केलेली समिती धडकली

गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीद्वारे अकोला शहरातील मालमत्तांचा सर्वे करून मालमत्ता कर नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने भरता यावा यासाठी एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले. याद्वारे ऑनलाइन कर भरणा प्रणाली सुरू करण्यात आली होती. ऑनलाइन कर भरणा प्रणालीबाबत संबंधित कंपनीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते.

प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वी या कंपनीचे काम बंद करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर आता नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. एक तर ही ऑनलाइन कर भरणा प्रणाली ओपन होत नाही किंवा ओपन झाली तरी या प्रणालीद्वारे नागरिकांना कर भरता येत नाही. काही नागरिकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे कर भरल्यानंतर दोन-तीन दिवसांत ते पैसे त्यांच्या खात्यात परत आलेत. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यात प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद घटनाबाह्य,” जितेंद्र आव्हाड यांचा दावा; म्हणाले, “तीन महिन्यांच्या आत…”

नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. अनेकांचे पैसे भरल्यावरदेखील त्यांना पावती मिळाली नाही. या सगळ्या घोळामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांचा ऑनलाइन व्यवहारांकडे कल वाढला असून अनेक नागरिक ऑनलाइन पद्धतीने आपले व्यवहार करतात. शिवाय जे नागरिक बाहेरगावी राहतात ते नागरिक आपल्या अकोला शहरातील मालमत्तांचे कर ऑनलाइन पद्धतीने भरतात. मात्र, या सगळ्या घोळामुळे ऑनलाइन कर भरणा रखडलेला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष देऊन ही यंत्रणा त्वरित सुरू करावी, अशी मागणी ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केली आहे.