अकोला : जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता अकोल्यात धडक दिली आहे. या आजाराचे पाच रुग्ण जिल्ह्यात आढळले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

सध्या राज्यभरात जीबीएस आजाराचे थैमान सुरू आहे. पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे लोण पसरले. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात जीबीएसच्या पाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यातील चार रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार करोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी. योग्य काळजी घेतल्यास जीबीएस आजारापासून आपण दूर होऊ शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास, तसेच बाहेरचे पाणी पिल्यास जीबीएसची लागण होण्याची शक्यता जास्त असते. अचानकपणे हाता, पायात, अंगात अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच जास्त काळ आलेला ताप, खोकला, उलट्या, जुलाब, असा त्रास झाल्यास त्वरित चाचण्या करून घेण्यात याव्यात, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  या आजाराची लक्षणे आढळतात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराच्या पाच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यातील चार रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सामान्य वार्डात उपचार सुरू आहेत. एका रुग्णावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार केले जात आहेत. – डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला.