अकोला : मोर आणि त्याचा पिसारा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. पावसाची चाहूल लागताच मोर अगदी आनंदाने पिसारा फुलवून थुई-थुई नृत्याने सर्वांनाच भुरळ घालतो. बेभान होऊन चित्तवेधक नृत्य करणाऱ्या मोरांच्या जोडीला ज्येष्ठ पक्षी मित्र दीपक जोशी यांनी आपल्या कॅमेरात कैद केले. मोर पिसारा फुलवून करीत असलेल्या नेत्रदीपक नृत्याची चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे. पर्यावरण प्रेमींनी मयूर नृत्याचा आनंद घेतला.
मयूर नृत्य हे मानवी मनाला मोहात पाडणारे आहे. हे नृत्य राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक समजले जाते. पावसाचे आगमन झाले की मोर आपला मनमोहक पिसारा फुलवून जोराने आवाज करीत नृत्य करतो. मयुराचे नर्तन म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक शुभ संकेत आहे. प्रणयकाळात मादीला स्वतःकडे आकर्षित करण्यासह आपल्या इतर प्रतिस्पर्ध्यांना आपला रूबाब, आपली ताकद दाखवून मीच कसा ‘श्रेष्ठ’ हे दाखविण्यासाठी नर मोर आपल्या मजबुत पायांच्या जोरावर शक्तिप्रदर्शन करीत असतो, असे ज्येष्ठ पक्षी मित्र दीपक जोशी यांनी सांगितले.
अकोला : मोर आणि त्याचा पिसारा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. पावसाची चाहूल लागताच मोर अगदी आनंदाने पिसारा फुलवून थुई-थुई नृत्याने सर्वांनाच भुरळ घालतो. बेभान होऊन चित्तवेधक नृत्य करणाऱ्या मोरांच्या जोडीला ज्येष्ठ पक्षी मित्र दीपक जोशी यांनी आपल्या कॅमेरात कैद केले.… pic.twitter.com/F8m5G7t3JG
— LoksattaLive (@LoksattaLive) August 14, 2025
मोराचे आवडते खाद्य साप, नाग हे प्राणी आहेत. आपल्या मजबूत पायांनी तो साप आणि नागाचा लिलया फडशा पाडतो. त्याचे हे चित्तवेधक नृत्य म्हणजे निसर्गाने दिलेले वरदानच होय. मोर हा शुभ संकेत देत असतो. मोराचे हे चित्तवेधक नृत्य बघून मानवी मनही हुरळून व हरखून जाते. याच प्रकारे मोराचा नृत्याविष्कार चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. लक्षवेधी मयूर नृत्य अकोल्याचे ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी टिपले. पुण्यातील वेताळ टेकडी येथील हे मनमोहक दृश्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रफितीमध्ये मोर पिसारा फुलवून आनंदाने नृत्य करीत साद घालीत आहे. त्याला प्रतिसाद देत त्या ठिकाणी आणखी एक मोर देखील दाखल होतो. निसर्गरम्य वातावरणात दोन्ही मोर एकत्रित दिसून येतात. वन्यजीव व निसर्गप्रेमींची या चित्रफितीला चांगलीच पसंती मिळत आहे.
मयूर नृत्याची संस्कृती
मयूर नृत्य मोराच्या मोहक आणि सुंदर हालचालींवर आधारित आहे. मोर जसा नाचतो, पिसे पसरवतो, त्याप्रमाणेच नर्तक नृत्य सादर करतात. काही ठिकाणी मयूर नृत्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा सणांमध्ये सादर केले जाते. ते भगवान कृष्णाच्या लीलांशी संबंधित आहे. मयूर नृत्य भारतीय कला आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग असून निसर्गाशी तो नाते जोडतो.