अमरावती : राज्‍यातील पावणेदोन कोटी शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपतीच्‍या सणात १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्‍याचा शासन निर्णय झाला. त्‍यात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्‍येकी एक किलो) अशा चार वस्‍तू आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्‍याने हे शिधावाटप थांबले. या वस्‍तू एकत्रितपणे ज्‍या पिशवीतून दिल्‍या जातात, त्‍यावर सत्‍ताधाऱ्यांची छायाचित्रे असल्‍याने अडचण निर्माण झाली होती, पण प्रशासनाने आता हे शिधावाटप पिशवीविना करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. सरकारने सण-उत्‍सवाच्‍या काळात सामान्‍य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्‍याचे निर्णय घेतले. गौरी-गणपतीच्‍या उत्‍सवातही तसाच निर्णय झाला होता. मात्र, अनेक जिल्‍ह्यांना तो वेळेत उपलब्‍ध झाला नाही आणि आता निवडणुकीची आचारसंहिता लागल्‍याने त्‍याचे वाटप थांबले आहे.

हेही वाचा – चंद्रपुरात ‘रमी क्लब’,‘सोशल क्लब’च्या नावावर आंतरराज्यीय जुगार …

दीड वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने १०० रुपये दर आकारून एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूंचा संच तयार करून तो शिधावाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता. अमरावती जिल्‍ह्यात आनंदाचा शिधा उशिरा उपलब्‍ध झाल्‍याने गणेशोत्‍सव काळात त्‍याचे पूर्ण वाटप होऊ शकले नाही. जिल्‍ह्यात एकूण ५ लाख २७ हजार ३४२ संच वाटपाचे नियोजन होते. त्‍यापैकी सप्‍टेंबर महिन्‍यात केवळ २७ हजार २२७ संच वाटप होऊ शकले, तर ऑक्‍टोबरमध्‍ये आतापर्यंत २ लाख ९० हजार ५१६ संच वाटप झाले आहे. म्‍हणजे एकूण ३ लाख १७ हजार ७४३ संच शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्‍यात आले आहेत. आता उर्वरित २ लाख ०९ हजार ५९९ संच वाटप कशा पद्धतीने करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला होता.

हेही वाचा – निवडणुकीवरच सर्वच ऊर्जा खर्च करू नका, उच्च न्यायालय जिल्हाधिकाऱ्यांना असे का म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखर, रवा, हरभरा डाळ आणि तेलाच्‍या पिशवीवर कोणत्‍याही राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांची छायाचित्रे नाहीत, त्‍यामुळे त्‍याच्‍या वाटपाला काहीही अडचण नाही. मात्र, ज्‍या पिशवीतून या सर्व वस्‍तू एकत्रितपणे दिल्‍या जातात, त्‍यावर पंतप्रधान, राज्‍याचे मुख्‍यमंत्री आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्र्यांची छायाचित्रे आहेत. त्‍यामुळे आचारसंहितेच्‍या काळात या पिशव्‍या न देता केवळ वस्‍तूंचे वाटप करण्‍याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वस्‍तू खरेदीच्‍या वेळी शिधापत्रिकाधारकांना घरून पिशव्‍या आणण्‍याच्‍या सूचना करण्‍यात येत आहेत.