अमरावती : सुमारे अठरा वर्षांपुर्वी अमरावतीच्या सहा निसर्ग संशोधकांनी विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगांमध्ये सर्वप्रथम शोधलेल्या अश्मयुगीन चित्र गुहेतील चित्रे भारतातील सर्वात प्राचीन शैलचित्र ठरु शकतात, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ विजय इंगोले यांनी व्यक्त केले आहे.

ही अश्मयुगीन आदी मानवाची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी वसाहत येथे असावी. मध्य प्रदेशातील ‘भिमबेटका’ येथील शैलचित्रे सर्वात जूनी म्हणजे १० ते १५ हजार वर्षांपूर्वीची असावीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु अमरावतीच्या निसर्ग संशोधकांनी शोधलेली शैलचित्रे ही भिमबेटका पेक्षाही जवळपास २० हजार वर्षांपूर्वीची आहेत. विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील अंबादेवी परिसरातील चित्रगुहेत सापडलेले शहामृगाचे चित्र, त्यांच्या अंड्याच्या कवचाचे डीएनए आणि कार्बन डेटिंगच्या परीक्षणानंतर ही शैलचित्रे २४ हजार ते ४२ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाले आहे.

यासंबंधी संशोधक डॉ विजय इंगोले यांचा शोध निबंध २०२० मध्ये प्रकाशित देखील झाला आहे. या संशोधन पत्राला मान्यता देखील मिळाली आहे . त्यावरुन भारतात ३५ हजार वर्षांपूर्वी शहामृगाचे अस्तित्व या भागात होते. तसेच त्याच्या अस्तित्वाच्या काळात अंबादेवी शैलगुहेतील चित्रे ही पूर्व अश्मयुगीन काळातील असल्याचेही स्पष्ट होते. अशा प्रकारचे शहामृगाचे चित्र भारतात कुठेही नाही.

अंबादेवी राक शेल्टर परिसरातील मुंगसादेव नावाच्या चित्रगुहेत इतर वन्यप्राण्यांच्या चित्राप्रमाणे शिवथेरियम ( जिराफ सदृश प्राणी), आर्डवार्कसारखा कीटकभक्षी प्राणी आणि आफ्रिकन रान कुत्र्यासारखे प्राणी अत्यंत बारकाईने चितारले आहेत. अश्मयुगीन आदीमानवाने चितारलेली वन्यजीवांची अशी अचूक चित्रे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष नजरेतून बघितलेली असल्याने शक्य झाले, असे संशोधक डॉ विजय इंगोले यांनी स्पष्ट केले.

हा जवळपास ३५ हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहांचा शोध फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन चित्रकलेच्या संदर्भातील एक क्रांतिकारी दावा ठरु शकतो. निसर्ग संशोधकांच्या चमूने आता भारतीय पुरातत्व विभाग आणि युनेस्को यांच्याकडे या परिसरास जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

या चमूमध्ये प्र.सु. हिरुरकर, पद्माकर लाड, डॉ मनोहर खोडे, शिरिष कुमार पाटील, ज्ञानेश्वर दमाहे यांचा समावेश होता. अंबादेवी शैलचित्रगुहा आणि तेथील अश्मयुगीन चित्र ही फक्त कला नाही तर ती भारतीय अश्मयुगीन इतिहासाची सर्वात प्राचीन साक्ष आहे, असा विश्वास डॉ विजय इंगोले यांनी व्यक्त केला आहे.