नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्यानंतर फडणवीस समर्थक माजी महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विविध भागात फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक लावले. मात्र त्या फलकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र न वापरून एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीस यांनी युतीचे सरकार असताना पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवला. गेल्या अडीच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून दमदार भूमिका निभावली. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे बहुमत असताना भाजपला यश मिळवून दिले. यासाठी फडणवीस यांचे कौतुकही झाले. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे पुन्हा फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार असे समजून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेकांनी फलकही तयार केले होते. जल्लोषाची तयारी केली होती. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केल्यानंतर काही वेळातच फडणवीस यांच्या डोक्यावर उपमुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरला. त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. फडणवीस मुख्यमंत्री न होण्याला केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचे भाजपचे कार्यकर्ते बोलू लागले.

दिसते ते काय?

फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप जोशी यांनी शहरातील विविध भागात अभिनंदन करणारे फलक लावले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील. चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांचे छायाचित्र आहे. मात्र केंद्रात दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या अमित शहा यांचे छायाचित्र वगळत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.